अमळनेर (प्रतिनिधी) गत सन २०२३च्या हंगामामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असूनही अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले असून विनाविलंब ही फि माफ करावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या शासनाने सन २०२३मध्ये जळगाव जिल्ह्यातील १हजार २१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व मदत घोषित केली होती. त्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफीचा समावेश होता. अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती होती. मात्र, असे असताना शैक्षणिक वर्ष २०२३- २४मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षार्थी यांच्याकडून ४९० तर आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ६२० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.
एकीकडे दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करायची अन् दुसरीकडे त्याच महसुली मंडळातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करायचे, ही बाब अन्यायकारक असून शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विनाविलंब माफ करावे, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.