मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीमधील संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) हे आयएएस अधिकारी त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरण्यावरून वादात सापडले आहेत. बरेच दिवस खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक सरावात व्यत्यय येत असल्याची तक्रार करत होते. पण कुत्र्याला फिरण्यासाठी खिरवारांनी अख्खं मैदान रिकामं केलं. केंद्रीय गृहमंत्रालयानं अधिकारी संजीव खिरवारांची बदली लडाखला केली असून त्यांच्या पत्नीची बदली अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आली.
या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार ‘गेल्या काही महिन्यांपासून खिरवार यांना संध्याकाळी स्टेडिअममध्ये डॉग वॉक करता यावा म्हणून खेळाडूंना लवकर मैदानाच्या बाहेर काढले जात असे. यापूर्वी रात्री 8.30 -9 पर्यंत खेळाडू त्यागराज स्टेडिअममध्ये सराव करत, पण खिरवार यांच्या फिरण्यात अडथळा नको म्हणून त्यांना संध्याकाळी 7 वाजताच मैदानाच्या बाहेर काढले जात असे. याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर होत होता. संजीव खिरवार यांनी आपण कधी-कधी कुत्र्यासोबत इथं फिरायला येतो, हे मान्य केलं होतं. त्यामुळे सरावात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता. आपण कुत्र्याला कधीही ट्रॅकवर सोडत नाही, तसंच कोणत्याही खेळाडूला बाहेर जाण्यास कधी सांगितलं नाही, असा त्यांनी दावा केला होता.
खिरवार यांनी आरोप फेटाळल्यानंतरही या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली. त्यागराज स्टेडिअम हे दिल्ली सरकारच्या अंतर्गत येते. हे प्रकरण उघड होताच सर्व स्टेडिअम रात्री 10 वाजेपर्यंत खेळाडूंसाठी उघडी असतील असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनीही हा दुर्दैवी प्रकार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं ही कारवाई केली आहे.