मुंबई (वृत्तसंस्था) आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची खलबतं झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अजित पवार म्हणाले, “आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या” अशा स्पष्ट सूचना पवार यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदरांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. पराभूत झालेल्या उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील वजन, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागात पक्षाची काय स्थिती आहे, यासह उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करून त्यावर मार्ग काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
पराभूत उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल? याचीही चर्चा या बैठकीत होऊन त्या अनुषंगाने जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष राज्यातील प्रमुख महानगरपालिकांसह महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका मांडल्यानं चर्चा सुरू झाली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.