अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) परिसरातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ३५ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली, राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम अनवर कुरेशी (वय ४७, रा. दिल्ली) व शिराजोद्दीन (४५, रा. जयपूर, राजस्थान) अशी संशयित आरोपी असलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
अडावदसह परिसरातील चांदसणी, कमळगाव, पिंप्री, वडगाव, लोणी, पंचक आणि धानोरा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड केली होती. टरबूजची मोठी आवक लक्षात घेता दिल्ली, राजस्थान आदी ठिकाणांहून टरबूज खरेदी करण्यासाठी व्यापारी आले. सुरुवातीला रोखीने खरेदी करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. नंतर ते शेतकऱ्यांना मूळ रकमेतील काही रक्कम देऊन टरबूज खरेदी करू लागले. त्यानंतर या व्यापाऱ्यांनी उधारीवर तब्बल ३५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे टरबूज खरेदी केले आणि मग गायबच झालेत. व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच समाधान धनगर (रा. कमळगाव) यांच्यासह १५ शेतकऱ्यांनी अडावद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नदीम कुरेशी व शिराजोद्दीन यांच्याविरुद्ध अडावद (ता. चोपडा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.