मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी राजकीय चर्चा सध्या रंगली आहे. ‘जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच यूपीएला मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास काय भूमिका असेल यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे जर यूपीएचे अध्यक्ष झाले तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण, पवार यांनी स्पष्ट केले आहे की, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत अजून कोणता प्रस्ताव आला नाही तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे’ असं संजय राऊत म्हणाले. “आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. “नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.