नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्त्रायलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती. या प्रकरणाचा छडा फाॅरेन्सिक तपासातून झाल्याचा खळबळजनक दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेसह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला होता. इस्त्रायली सॉफ्टवेयर पिगॅससद्वारे केलेल्या गुप्तहेरीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहिती आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये ३०० हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.
राज्यसभेत सीपीआय नेते बिनॉय विश्वम, राजद खासदार मनोज झा, आपचे खासदार संजय सिंहसहीत अनेक खासदारांनी या विषयावर चर्चा करण्याची राज्यसभेत मागणी केली आहे. आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा संसदेत उचलून धरू, असं काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.
















