मेष : दिनांक १९ रोजी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. हा दिवस फारसा अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. या चांगल्या दिवसांमध्ये कामातील गती वाढेल. कामे अगदी वेळेत पार पडतील. यापूर्वी जो चढउतार जाणवला तो आता जाणवणार नाही. सध्या कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांना विश्वासात घेऊन काम केले तर कामाचा व्याप वाढणार नाही. उत्साह वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल.
वृषभ : सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. सर्व दिवस चांगले असूनही एक प्रकारचा आळस तुमच्यामध्ये राहणार आहे. हा आळस बाजूला सारून काम करायचे ठरवले तर कामे पूर्ण होतील. त्यामुळे कारण नसताना धावपळ करावी लागणार नाही हे लक्षात ठेवा. अमावास्या कालावधीत धाडसी निर्णय घेऊ नका. व्यावसायिकदृष्टय़ा संघर्ष वाटला तरी तो फार कमी दिवसांसाठी असणार आहे. भागीदारी व्यवसायात हिशोब चुकते ठेवा.
मिथुन : दरवेळी होणारी कसरत आता करावी लागणार नाही. कितीही व्यवस्थापन करून कामाचे नियोजन करायचे ठरवले तरी ते होतेच असे नाही. पण दिवस चांगले असतील तर हे नियोजन मात्र यश देणारे असते. व्यवसायात इतरांनी केलेल्या सहकार्यामुळे कामातील ताणतणाव कमी होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा प्रतिसाद मिळेल. आर्थिकबाबतीत परिस्थिती चांगली असेल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता चांगली राहील.
कर्क : दिनांक १३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. ज्या वेळी चांगल्या दिवसांची वाटचाल चालू होते त्या वेळी आलेली संधी सोडायची नसते हे लक्षात ठेवा. या सप्ताहात जे प्रस्ताव तुमच्यासमोर येणार आहेत ते स्वीकारा. त्यांना होकार किंवा नकार द्यायला उशीर करू नका. प्रत्येक कामातील वाटचाल सोपी राहील. व्यवसायातील सध्याच्या परिस्थितीत चांगले बदल होतील. स्वतंत्र व्यवसायाला प्राधान्य द्या.
सिंह : दिनांक १४, १५, १६ या तीन दिवसांत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. अनोळख्या व्यक्तीशी दोन हात लांब राहा. या तीन दिवसांत वादविवादाचा प्रसंग येऊ शकतो. त्या वेळी तो शांततेने हाताळल्यास हा वादविवाद होणार नाही. जे काम करायला जाणार त्या कामाला नेमकाच उशीर होणार, त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. तेव्हा हे तीन दिवस कोणतीही अपेक्षा ठेवू नका, पण प्रयत्न सोडू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात एक ना धड भाराभर चिंध्या करण्यापेक्षा एकाच गोष्टीकडे लक्ष द्या.
कन्या : दिनांक १७, १८ रोजीचे दोन दिवस पळापळ करू नका. फार पळापळ करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. जे जमणार नाही त्या गोष्टींच्या मागे लागू नका. मर्यादित गोष्टी करा. ठरवून काही बोलायचे नाही असा जरी तुमचा स्वभाव नसला, तरीसुद्धा सध्या परिस्थिती स्पष्ट बोलण्यासारखी येणार आहे. हे दोन दिवस शांत राहा. विचारपूर्वक वागा. बाकी दिवसही चांगले असतील. व्यावसायिक परिस्थिती ठीक असेल. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. आर्थिकबाबतीत खर्च करताना नियोजन बिघडणार नाही याची विशेष काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात झालेले बदल स्वीकारणे योग्य राहील. कुटुंबाला समजून घ्या. परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रकृतिस्वास्थ्य जपा.
तूळ : आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडणे म्हणजे शुभ ग्रहांची साथ आहे असे समजा. सध्या शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. ज्या वेळी असे ग्रहमान असते त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, समोरून प्रस्ताव केव्हा येईल याची वाट पाहत बसायचे नाही. स्वत:हून प्रयत्न करायचा म्हणजे त्या प्रयत्नांना यश मिळणार हे नक्की. तेव्हा चांगल्या कालावधीत स्वत:हून संधी सोडायची नाही. व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्री व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतील.
वृश्चिक : दिनांक १३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस चांगले असतील. चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. प्रत्येक वेळी वाटणारा नकारार्थी विचार आता बदलणारा असेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. दुसऱ्यांसाठी वेळ काढून ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या. सध्याचे दिवस चांगले असल्यामुळे बाकी राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे कामाची गती वाढवा. अमावास्या कालावधी चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा धाडसी निर्णय घेताना भविष्याचाही विचार करा.
धनू : दिनांक १४, १५, १६ या दिवसांत सहजवारी कोणतीही गोष्ट करायला जाऊ नका, त्यामध्ये नुकसान होऊ शकते. आपले मत इतरांना पटावे असे वाटत असेल तर सध्या त्यावर चर्चा करू नका. हे दिवस फारसे चांगले नाहीत. या चर्चेतून हातात आलेल्या गोष्टी निसटू शकतात. शांत राहून आपले काम कसे करून घ्यायचे हेच लक्षात ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील स्थिती चांगली असेल, पण तेवढी धावपळही राहणार आहे. नोकरदार वर्गाला कामामध्ये वरिष्ठांचा पाठिंबा राहील.
मकर : प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करत बसू नका. स्वत:च्या हाताने स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. नवीन काही गोष्टी करायला जाऊ नका. थोडा थांबण्याचा प्रयत्न करा. विचाराने निर्णय घेऊन पाऊल उचला. घाई करू नका. बोलताना शब्द जपून वापरा. व्यवसायात गुंतवणूक करताना विचार करा. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव विसरून चालणार नाही. आर्थिक बाबतीत उधारीचे व्यवहार टाळा. समाजमाध्यमांचा वापर न केलेला चांगला. कुटुंबाशी वादविवाद टाळा. मानसिक समतोलता राखा.
कुंभ : कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा. एखादी गोष्ट नाही पटली म्हणून त्याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणासमोर मांडू नका. हे दिवस कसे पुढे ढकलता येतील ते पाहा. अमावास्या प्रहर संपेपर्यंतचा कालावधी शांततेने हाताळा. व्यवसायात नवीन घडामोडी टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिक व्यवहार करताना हुशारीने वागा. मित्रांसोबत मनमोकळेपणाने बोलाल तर बराच ताणतणाव कमी होईल. कुटुंबातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या.
मीन : दिनांक १७, १८ या दोन दिवसांत विचारपूर्वक निर्णय घ्या. हे दोन दिवस अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे कोणत्याही कामात उत्साह वाटणार नाही. ज्या गोष्टींविषयी खात्री होत नाही तोपर्यंत त्याची वाच्यता करू नका. कोणतेही काम करताना त्याचे नियोजन करा. त्यामुळे ते काम फसणार नाही. अमावास्या दिवस चांगला जाईल. बाकी दिवसांचाही कालावधी उत्तम असेल. व्यवसायात काही जुने व्यवहार बाकी असतील तर ते पूर्ण करताना संयम ठेवा. नोकरदार वर्गाला कामाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडता येईल.