मेष : १५ जानेवारी रोजी होणारी मकरसंक्रांत तुमच्यासाठी आनंदी असेल. तर दिनांक १८, १९ असे हे दोन दिवस मात्र जे काही व्यवस्थापन कराल त्यात बदल होणार आहेत हे धरून चाला. महत्त्वाच्या गोष्टी या दोन दिवसांत करू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात अनेक मार्गातून यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे लागेल. आर्थिक बाबतीत नियोजन करा. (Weekly Horoscope 15 to 21 January 2023)
वृषभ : मकरसंक्रांतीच्या दिवशी गुळाच्या गोडीप्रमाणे दिवस कसा गोड जाईल हेच बघा. जिभेवर ताबा ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये माझेच खरे करत बसू नका. सहनशीलता ठेवा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात करू नका. नोकरदार वर्गाला धावपळ करून चालणार नाही. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात सध्या उत्साह वाटणार नाही.
मिथुन : मकरसंक्रांतीचा दिवस उत्साहात साजरा कराल. दिनांक १८, १९ हे दोन दिवस कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. भावनिक होऊन निर्णय घेणे त्रासाचे राहील. कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा. हे दोन दिवस सोडले तर बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात धावपळ वाढेल. धावपळ जरी वाढली तरी फायद्याचे प्रमाणही वाढणार आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या व्यापात व्यस्त राहावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल.
कर्क : मकरसंक्रांतीचा दिवस आनंददायक असेल. या शनीचा इथून पुढचा प्रवास सुखकर कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करा. कोणतेही धाडसी निर्णय घेताना विचार करावा लागेल. १९ तारखेला दुपारनंतर २०, २१ तारखेला संपूर्ण दिवस मनात आले म्हणून केले असे करून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन नीट करावे लागेल. इतरांचे मत ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. अमावास्या प्रहरात वादविवाद टाळा. व्यवसायात नवीन बदल करू नका.
सिंह : मकरसंक्रांतीचा दिवस सर्वासोबत मिळून मिसळून राहिल्यास चांगला जाईल.व्यावसायिकदृष्टय़ा गोष्टी जमेच्या ठरतील. पारंपरिक व्यवसायाचे महत्त्व वाढेल. नफ्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामकाजातील अडथळा दूर होईल. आर्थिकदृष्टय़ा शुभ संकेत मिळतील. राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे काम हाती येईल. संतती बाबतीत गोड बातमी कळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल.
कन्या : मकरसंक्रांतीचा दिवस आनंददायक असेल. व्यावसायिक मोबदला चांगला मिळेल. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. समाजसेवा केल्याचा आनंद मिळेल. नातेवाईकांशी संवाद साधाल. भावंडाच्या गरजा पूर्ण कराल. घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल.धार्मिक गोष्टींत सहभाग राहील. मानसिक समाधान मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : मकरसंक्रांतीच्या दिवशी चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. ही संक्रांत मनाला सुखद आनंद देणारी असेल. अमावास्या पराक्रम स्थानातून होत आहे. सर्व दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यावसायिकवाढीसाठी केलेल्या जाहिरातीचा उत्तम नफा मिळेल. भागीदारी व्यवसायातील उधारी वसूल होईल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. भावंडांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : दिनांक १५, १६, १७ हे तीन दिवस आपण एखाद्याला दिलेल्या शब्दाची विश्वसनीयता जपा. इतरांनी आपल्याला सल्ला द्यावा ही गोष्ट आपल्याला मुळीच पटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी त्याचा फार मोठा बाऊ करू नका. वादविवादापासून लांब राहा. बाकी दिवस चांगले राहतील. व्यवसायात हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका. नोकरदार वर्गाने शांतपणे कामात मन रमवावे. मकरसंक्रांतीच्या दिवशी कोणाशीही संवाद साधताना मनात राग धरू नका. हा दिवस आनंदात घालवा.
धनू : मकरसंक्रांतीचा दिवस लाभदायक राहील. १७ तारखेला दुपारनंतर दिनांक १८, १९ संपूर्ण दिवस मर्यादित गोष्टी करा. ज्या गोष्टीतून त्रास वाढणार आहे अशा गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करू नका. हे दिवस शांततेत पार पाडा. बाकी दिवसांचा कालावधी ठीक आहे. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. व्यवसायात नवीन व्याप काही वाढवू नका.नोकरदार वर्गाचे कामातील नियोजन न बदललेले चांगले. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. राजकीय क्षेत्रात अनावश्यक बाबी टाळा. मित्रपरिवाराची मदत घ्याल.
मकर : मकरसंक्रांतीचा दिवस धावपळीचा राहिला तरी चांगला जाईल. अमावास्या कालावधीत चिडचिड करणे टाळा. १९ तारखेला दुपारनंतर २० तारखेला संपूर्ण दिवस, २१ तारखेला दुपापर्यंतच्या कालावधीत संयम ठेवून वागावे लागेल. व्यवसायात आलेले प्रस्ताव स्वीकारताना भावनिक होऊन स्वीकारू नका. व्यवहारात्मक गोष्टींनाच महत्त्व द्या. नोकरदार वर्गाने कामात सध्या सेवाकार्य करायचे हे लक्षात ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
कुंभ : मकरसंक्रांतीचा दिवस गुळाच्या गोडीप्रमाणे गोड राहील. १७ जानेवारीला एकांतवासात न घालवता सर्वासोबत मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टींचा ताण होता तो कमी होणार आहे. कामे चुटकीसरशी होतील. उद्योगधंद्यात भरभराट होईल. खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होईल. कलाकुसरीच्या वस्तूंना मागणी राहील. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिक सफलता मिळेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. मानसिकदृष्टय़ा समाधान लाभेल.
मीन : मकरसंक्रांतीचा दिवस मनामध्ये कोणतीही अढी न ठेवता उत्साहाने साजरा करा. १७ जानेवारी रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करत असून, तो तुमच्या व्ययस्थानात येईल. या शनीचा इथून पुढचा प्रवास हा खर्च व कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा आहे. तेव्हा या गोष्टीवर नियंत्रण ठेवायला शिका. अमावास्या प्रहरात ज्येष्ठांचा सल्ला घ्या. दिनांक १५, १६ संपूर्ण दिवस १७ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. राग राग करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. बाकी दिवस ठीक असतील. खर्च जपून करा.