मेष : इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. अमावास्या भाग्यस्थानातून होत आहे. अमावास्या दिवस चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा कोणतेही निर्णय घेताना धीर धरा. वनस्पतीजन्य मालाची साठवणूक जास्त करू नका. नोकरदार वर्गासाठी वरिष्ठांकडून आलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे लागेल. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. जोडीदाराच्या मनाचा विचार करा. मागील काही दिवसांत आलेला अनुभव विसरून चालणार नाही. या सप्ताहात कोणाला सल्ला द्यायला जाऊ नका व कोणाचा सल्लाही घेऊ नका, त्यामुळे नुकसान होऊ शकते.
वृषभ : एखादी गोष्ट नाही पटली तर पुढे जा, त्यामध्ये अडकून राहू नका. अन्यथा ध्यानीमनी नसताना विनाकारण एखाद्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. गोष्ट चांगली असो वा वाईट, त्याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. या कालावधीत शांत राहणे उत्तम राहील. व्यवसायात कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल. त्यासाठी पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे. नोकरदार वर्गाला कामामध्ये लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. राजकीय क्षेत्रापासून दूर राहा.
मिथुन : व्यवसायात चाललेल्या घडामोडींत अचानकपणे बदल करावे लागतील. मात्र हे बदल चांगल्या गोष्टींसाठी असतील. गुंतवणुकीचा फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. दिनांक २१, २२ रोजी कोणतीही नवी सुरुवात करू नका. या दोन दिवसांत एखादा चांगला प्रस्ताव जरी आला तरी त्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका, थोडे थांबा. या दोन दिवसांनंतरच प्रतिक्रिया द्या.
कर्क : सहनशीलता नाही ठेवली तर याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात स्पर्धा करून चालणार नाही. नोकरदार वर्गाने जे कार्य हाती घेतलेले आहे ते कार्य सफल होईल. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती चांगली असली तरी खर्च कमी करा. दिनांक २३ आणि २४ रोजी आळस झटकून कामाला लागा. थोडी पळापळ झाली तर चिडचिड करू नका. ही पळापळ चांगल्या कारणासाठी होईल.
सिंह : समोरून येणाऱ्या प्रस्तावाला विरोध करू नका. तो आगामी काळासाठी योग्य राहील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. बाजारपेठेचा अंदाज बरोबर असेल. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणे सहज शक्य होईल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या संमतीनेच करार करावेत. आर्थिक बाजू भक्कम होईल. सप्ताहातील सर्व दिवस शुभदायक राहतील. सर्व दिवसांचा कालावधी शुभदायक असल्यामुळे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा. ही कामे पूर्ण होणारी आहेत. त्यासाठी उशीर करू नका. इतरांच्या मार्गदर्शनाची गरज भासणार नाही.
कन्या : थांबलेले गती चक्र पुन्हा सुरळीत चालू होईल. स्थिरपणे निर्णय घ्यायला चांगले जमेल. इतरांना केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरेल. व्यवसायात पर्यायी मार्ग मिळाल्यामुळे गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक फायद्याची ठरेल. नोकरदार वर्गाला कामातील अचूकता साधता येईल. आर्थिक बाबतीत परिस्थिती समाधानाची असेल. आठवडय़ामध्ये काही दिवस असे जातात की अस्वस्थता जाणवू लागते. या आठवडय़ात मात्र तसे होणार नाही. ही अस्वस्थता जाणवणार नाही.
तूळ : कितीही दुराव्याच्या गोष्टी असल्या तरी त्या चांगल्या होणाऱ्या आहेत. ज्या ज्या व्यक्तींना आतापर्यंत गैरसमज निर्माण झाले होते हे गैरसमज आता दूर होतील. अमावास्या पराक्रम स्थानातून होत आहे. या प्रकारात शेजाऱ्यांशी मात्र जेवढय़ास तेवढे राहा. व्यवसायातून उत्पन्नाचा स्रोत कमी जरी असला तरी तोटा निश्चित नाही. व्यवसायात चढ-उतार जाणवेल. नोकरदार वर्गाला कामात चांगले बदल होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आर्थिकबाबतीत बचत करणे इष्ट राहील. समाजसेवेची आवड निर्माण होईल. भावंडांशी वादविवाद टाळा.
वृश्चिक : कोणतेही टोकाचे निर्णय घेऊ नका. राग राग करून स्वत:लाच मनस्ताप होऊ शकतो. अमावास्या प्रहरात बोलण्यातून गैरसमज वाढू शकतात. तेव्हा कोणत्याही गोष्टीचे स्पष्ट वर्णन करत बसू नका. मात्र खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. भागीदारी व्यवसायातील हिशोब चोख ठेवा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकबाबतीत पर्यायी मार्ग मिळेल. दिनांक १९, २० हे दोन दिवस कसे चांगले घालवता येतील हे बघा. विनाकारण होणाऱ्या वादविवादाला थारा देऊ नका. शांत राहून विषय मिटवण्याचा प्रयत्न करा.
धनू : व्यवसायात उधारीचे व्यवहार टाळा. रोखठोक व्यवहारामुळे फायद्याचे प्रमाण चांगले राहील. व्यावसायिकदृष्टय़ा इतरांची मदत घेताना भान ठेवा. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी कमी होतील. कामे वेळेत पार पडतील. आर्थिक खर्च कमी करा. मैत्रीच्या नात्यातील दुरावा वेळीच दूर करा. दिनांक २१, २२ रोजी बोलताना विचार करून बोला. एकदा गेलेला शब्द परत येणार नाही हे विसरू नका. आपली किंमत आपणच कमी करून घेऊ नका. ज्या गोष्टी तुम्हाला पटणाऱ्या नाहीत त्याचा विचार करणे टाळा.
मकर : इतरांच्या भरवशावर कोणतीही गोष्ट साध्य होत नाही याचा अनुभव आल्याने सतर्क राहाल. स्वत:च्या मनाला पटतील अशाच गोष्टी कराव्याशा वाटतील. व्यापारी क्षेत्रात सरशी होईल. अनेक मार्गातून आलेल्या संधीचा फायदा होईल. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कराल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांना न दुखवता कामकाज वेळेवर पूर्ण करणे महत्त्वाचे राहील. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. नातेवाईकांकडून सुवार्ता समजेल. भावंडांविषयी कौतुक वाटेल. धार्मिक गोष्टीतील उत्साह टिकून राहील.
कुंभ : स्वत:चे मत इतरांना पटवून द्याल. आता कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. अमावास्या लाभस्थानातून होत आहे. अमावास्या कालावधी सुखकर जाईल. व्यवसायात उलाढाली वाढतील. मात्र मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य ठिकाणी वापर करा.नोकरदार वर्गाला संशोधनात्मक गोष्टीत यश मिळेल. आर्थिकबाबतीत लाभ होईल. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मानसिक समाधान लाभेल.
मीन : व्यापारी वर्गाला सध्याचे दिवस लाभदायक ठरतील. भागीदारी व्यवसाय असलेल्यांना नफ्याचे प्रमाण चांगले राहील. दिनांक १९, २० रोजी घाई करून निर्णय घेणे योग्य राहणार नाही. चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. सकारात्मक विचार करायला शिका. प्रत्येक गोष्टीचे नियोजन अचूक हवे. तेव्हा हे दोन दिवस कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. आर्थिकबाबतीत व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. भावंडांवर एखादी गोष्ट लादण्याचा प्रयत्न करू नका.