मेष : चांगल्या कालावधीत नेहमी सकारात्मकता वाढत असते हे विसरू नका. तेव्हा ही सुवर्णसंधी आहे असे समजा. व्यावसायिकदृष्टय़ा तुम्ही स्वत:हूनच बदल करून कामाचा व्याप वाढवणार आहात. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कराल. सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे कोणतेही काम करताना उत्साह वाढेल. ज्या वेळी परिस्थिती हाताबाहेर असते त्या वेळी नको तेवढा प्रयत्न करता व ती कामे यशस्वी झाली नाही की नाराजही होता.
वृषभ : व्यवसायात इतरांनी मार्गदर्शन करावे, ही अपेक्षा मनात न ठेवता काम केलेले चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी वेळीच सुधारल्या तर कामाला वेळ लागणार नाही. आर्थिक नियोजन चांगले असेल. राजकीय क्षेत्रात कामात व्यस्त राहाल. भावंडांच्या संदर्भात घेतलेले निर्णय योग्य असतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. सप्ताहातील असा कोणताच दिवस नाही की ज्या दिवशी हुरहुर वाढणार आहे आणि मन अस्वस्थ होणार आहे. प्रत्येक दिवस हा चांगला जाणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज वाटणार नाही. या सप्ताहात अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त प्रगती होईल.
मिथुन : धनस्थान मजबूत होईल. व्यावसायिक उलाढाल वाढलेली असेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामांमध्ये ज्या गोष्टींविषयी शंकाकुशंका वाटत होत्या त्या शंकांचे निरसन होईल. आर्थिकदृष्टय़ा मजबुती येईल. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. भावंडांना वेळीच समज द्या. ज्या गोष्टींना बरेच दिवस उशीर लागत होता त्या गोष्टी वेळेत होतील. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेता येईल. चांगल्या कालावधीमध्ये इतरांकडून मार्गदर्शनही चांगलेच मिळेल. स्वत:च्या हिमतीवर कामात यश मिळेल.
कर्क : प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. सध्या कोणाचे मत काय, या विषयावर चर्चा करू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. खर्च आटोक्यात ठेवा. दिनांक २१, २२, २३ असा हा तीन दिवसांचा कालावधी सुखकर कसा जाईल तेच पाहा. कोणाच्या सांगण्या- बोलण्याचा फारसा विचार करू नका. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्हालाच त्रास होऊ शकतो. शांत राहूनच काम करणे योग्य राहील.
सिंह : व्यावसायिकदृष्टय़ा जी सुरळीत घडी चाललेली आहे त्यात बदल होतील. त्यासाठी तुम्हालाच पर्यायी मार्ग शोधावे लागतील. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. दिनांक २४, २५ रोजी कितीही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर त्या उलट होणार आहेत. त्यामुळे मनाची चंचल अवस्था वाढणार आहे. अशा वेळी ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हे सूत्र लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागणार आहे हे माहीतच आहे. त्यामुळे त्यासाठी धावपळ करायची नाही.
कन्या : वेळेचे बंधन पाळा. त्यामुळे त्रास वाढणार नाही. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळाढवळ करू नका. स्वत:साठी वेळ द्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. गुरुपुष्यामृत योग लाभस्थानातून होत आहे. या दिवशी नक्कीच गुंतवणुकीचा विचार करा. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत चढउतार राहील. दिनांक २६, २७ या दोन दिवसांत आळस वाढणार आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट नियोजनाने करा.
तूळ : सर्वच बाजूंनी समाधानाची बाब राहील. स्थावर मालमत्तेबाबत चर्चा करायची असल्यास योग्य वेळ आहे. व्यावसायिकदृष्टय़ा लाभदायक दिवस असतील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत आघाडी मिळवाल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. सप्ताहातील सर्वच दिवस चांगले असणार आहेत. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे हे लक्षात ठेवा. मग चांगल्या गोष्टींसाठी उशीर कशाला? आपली बाजू इतरांनी ऐकून घेण्याची ही वेळ आहे. अशा वेळेलाच महत्त्व देऊन आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : व्यवसायात व्यवहाराच्या बाबतीत कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घातलेले चांगले राहील. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. नातेवाईकांशी संवाद साधाल. दिनांक २१, २२, २३ या तीन दिवसांच्या कालावधीत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून इतरांनी बदल करावा, ही अपेक्षा सोडून द्या. त्यासाठी स्वत:तच बदल करा. सध्या वेळ चांगली नसताना कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. या गोष्टी उलट तुमच्याच अंगलट येऊ शकतात. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.
धनू : व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पटकन करून घ्या. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाच्या कामकाजात झालेले बदल स्वीकारावे लागतील. आर्थिक बाबतीत योग्य असे नियोजन करा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता राहणार नाही. दिनांक २४, २५ हे दोन दिवस कलह वाढणार नाहीत याची काळजी घ्या. कुठेही तीव्र प्रतिक्रिया देऊ नका. जे चालले आहे त्यातच समाधान माना. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करत बसू नका. त्यामुळे गैरसमज वाढू शकतात.
मकर : या सप्ताहात ‘आपले काम भले नि आपण भले’ हेच लक्षात ठेवा. व्यावसायिकदृष्टय़ा भागीदारीसाठी काही प्रस्ताव आला तर तो स्वीकारू नका. स्वतंत्र व्यवसायालाच महत्त्व द्या. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले. आर्थिक बाबतीत व्यवस्थापन नीट करा. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवणार नाही. समाजमाध्यमांचा वापर सध्या करूच नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. सध्या आपली पोळी भाजणार नाही हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे सप्ताहातील सर्वच दिवस जपून पाऊल टाकावे लागेल.
कुंभ : व्यवसायात काही अडचणी आल्या तरी त्या निवळण्यासारख्या आहेत. त्यावर पर्यायी मार्ग लगेच मिळेल. नोकरदार वर्गाने कामाच्या बाबतीत दुहेरी भूमिका टाळा. खर्च कमी करा. सार्वजनिक ठिकाणी सहभागी होताना भान ठेवा. संततीविषयक गोड बातमी कळेल. दिनांक २४, २५ हे दोन दिवस वेळीच सावधानता बाळगलेली चांगली. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यासाठी स्वत:वर नियंत्रण ठेवा. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. अशा कालावधीत मतभेद वाढू शकतात. ते वाढणार नाहीत यासाठी प्रयत्न करा.
मीन : मागील अनुभव विसरू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. गुरुपुष्यामृत योग तुमच्या पंचमस्थानातून होत आहे म्हणजेच हा दिवस लाभाचा आहे असे म्हणायला हरकत नाही. या दिवशी शुभ गोष्टींची सुरुवात होईल. व्यवसायात आवक उत्तम राहील. नोकरदार वर्गाला तांत्रिक अडचणीमुळे जे अडथळे येत होते ते कमी होतील. आर्थिकदृष्टय़ा उधारी टाळा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मुलांचे हट्ट पूर्ण कराल. दिनांक २६, २७ हे दोन दिवस शांत राहून सुवर्णमध्य साधा. रागराग करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. कोणावर भरवसा न ठेवता स्वत:चे काम स्वत: करा.