मेष : नवीन व्यवसायाची सुरुवात चांगली राहील. जुन्या काही व्यवहारांतून येणे बाकी असेल तर ते सध्या मिळू शकेल. नोकरदार वर्गाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आर्थिकदृष्टय़ा आघाडी मिळवाल. नातेवाईकांची ऊठबस करावी लागेल. सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कामासाठी आता उशीर लागणार नाही. प्रत्येक गोष्ट वेळेत होणार आहे. या संधीचा फायदा घेऊन कामाला लागा.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. नवीन व्यवसायासाठी काही प्रयत्न करत असाल तर निश्चित करा. नोकरदार वर्गाचा कामातील उत्साह टिकून राहील. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. ज्या गोष्टी करायच्या आहेत; पण त्यासाठी वेळच येत नाही, असे जे तुमच्या मनात घोळत होते अशा गोष्टींचा श्रीगणेशा होणार आहे. तेव्हा तयारी करायला कुठे कमी पडू नका. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळणार आहे.
मिथुन : दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चांगल्या दिवसांच्या कालावधीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. या कालावधीत शुभ गोष्टी करा. व्यापारी वर्गाने बाजारपेठेचा अंदाज घेऊन गुंतवणूक करावी. छोटय़ामोठय़ा उद्योग- व्यवसायात उधारी टाळा. दिनांक २६, २७ हे दोन दिवस असे आहेत, की या दिवशी स्वत:वर कितीही नियंत्रण ठेवायचे म्हटले तरी ठेवता येणार नाही. त्यामुळे मनस्ताप वाढू शकतो.
कर्क : व्यवसायात भागीदारी करार करायचा असल्यास योग्य ती काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक उत्पन्न चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा. दिनांक २८, २९, ३० असे हे तीन दिवस शब्दाने शब्द वाढणार आहे. अशा वेळी कोणत्याही प्रतिक्रिया न दिलेल्या चांगल्या. या दिवसांत महत्त्वाचे कोणतेही निर्णय घेऊ नका. कारण त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास होऊ नये म्हणून आपणच शांत राहिलेले चांगले. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील.
सिंह : व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पटकन करून घ्या. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला चांगल्या गोष्टींसाठी वरिष्ठांचा पािठबा मिळेल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत होईल. दिनांक ३१ मार्च व १ एप्रिल हे दोन दिवस ‘आपले काम भले नि आपण भले’ हेच लक्षात ठेवा. कारण नसताना एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते. पण शांतपणाने पर्यायी मार्ग काढून पुढे गेलेले चांगले राहील. ज्या गोष्टीतून काही साध्य होणार नाही अशा गोष्टींसाठी वेळ घालवू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
कन्या : व्यावसायिकदृष्टय़ा आलेले प्रस्ताव स्वीकारा. याचा फायदा आगामी काळासाठी होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. आर्थिक आवक उत्तम राहील. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे सप्ताहातील सर्वच दिवस चांगले असतात. यातील कोणताच दिवस काळजी करावयास लावणारा नाही. असे दिवस म्हणजे सुखाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणणे वावगे ठरणार नाही. ज्या गोष्टींविषयी नेहमी चिंता वाटत होती ती आता वाटणार नाही.
तूळ : व्यवसायातून जे उत्पन्न मिळेल त्याची गुंतवणूक लगेच करा. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. दिनांक २६, २७ रोजी ज्या गोष्टीपासून वाद होणार आहे असे संकेत दिसू लागतात. अशा गोष्टींपासून लांब राहा. आपली बाजू प्रामाणिक जरी असली तरी समोरच्याला ती वाटणारी नाही. त्यामुळे आपण आपले मत इतरांना न सांगितलेले चांगले. तेव्हा हे दोन दिवस शांत राहिलेले चांगले. बाकी दिवस उत्तम जातील.
वृश्चिक : व्यावसायिक परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाचा कामामध्ये बराच वेळ जाईल. अपेक्षा मर्यादित ठेवल्या तर खर्च कमी होईल. सध्या समाजमाध्यमांचा वापर न केलेला चांगला. कुटुंबाशी वाद टाळा. दिनांक २८, २९, ३० रोजीचे तीन दिवस काळजीपूर्वक हाताळावे लागतील. आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. आपलेच खरे करण्यात वेळ घालवू नका. थोडे इतरांचेही ऐकून घेण्याची क्षमता वाढवा. शांतपणाने निर्णय घेतल्यास त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.
धनू : सध्या सर्व दिवसांत जपून पाऊल टाकावे लागेल. एक घाव दोन तुकडे केले तर त्याचा सर्वात जास्त त्रास तुम्हालाच होईल. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त शांत राहता येईल तेवढे तुमच्यासाठी चांगले राहील. सहनशीलता ठेवा. एखादी गोष्ट तुमच्या मनाला नाही पटली तर त्याचा जास्त बाऊ करत बसू नका. ती गोष्ट सोडून द्या. इतरांवर अवलंबून राहू नका. व्यावसायिकदृष्टय़ा गुंतवणूक करताना आवक पाहून गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाला कामात लक्ष केंद्रित करावे लागेल.
मकर : व्यवसायामध्ये अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका किंवा त्या व्यक्तीशी कोणताही करार करू नका. दिनांक २८, २९, ३० रोजीचे दिवस जास्तीत जास्त कामात कसे गुंतून राहता येईल हे बघा. त्यामुळे हे तीन दिवस कसे गेले हे कळणारे नाहीत. समोरून एखादा प्रस्ताव चांगला आहे असे जरी वाटले तरी या दिवसांत स्वीकारू नका. त्यासाठी थोडा वेळ द्या. विचार करून निर्णय घ्या. उशिरा निर्णय घेतला म्हणून संधी जाणार नाही. उलट उशिरा निर्णय घेतल्यामुळे नुकसान होणार नाही हे मात्र निश्चित. न जमणाऱ्या गोष्टींबद्दल वचनबद्ध राहू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील.
कुंभ : व्यवसाय म्हटले की चढउतार आलेच. दलाली व्यावसायिकांना सध्याचे दिवस चांगले असतील. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. आर्थिक बाबतीत समाधानी वृत्ती राहील. राजकीय क्षेत्रात नवीन कामाची सुरुवात होईल. मुलांचा हट्ट पूर्ण करताना त्यांची शिस्त बिघडू देऊ नका३१ मार्च व १ एप्रिल हे दोन दिवस कोणतेही महत्त्वाचे काम करताना सतर्कता बाळगा. नियोजनानुसार काम करा. स्वत:च्या वैयक्तिक गोष्टी कोणासमोर व्यक्त करू नका. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून प्रयत्न करायचे सोडू नका. आपले मत इतरांनी ऐकून घ्यावे, ही अपेक्षा ठेवू नका. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील.
मीन : व्यवसायात फायद्याचे प्रमाण जास्त राहील. नोकरदार वर्गाचे कामकाजाचे वेळापत्रक व्यस्त राहील. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक कराल. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अंदाज येईल. या सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. नवीन उत्पन्नाच्या संधी मिळतील. कामे अगदी सहज गतीने होतील. इतरांचे सहकार्य मिळेल. हाती घेतलेले काम तडीस न्याल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन उत्तम जमेल. त्यामुळे काम कोणते बाकी राहणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा आवक-जावक वाढेल.