मेष : सध्याची वेळ-काळ आपल्याला साथ देणारी नाही हे लक्षात ठेवा. काही वेळेस आपण कोणाच्याही भानगडीत न पडताही समोरून येणाऱ्या प्रतिक्रिया या वादाच्या असू शकतात; तेव्हा शांततेच्या मार्गाने गोष्टी हाताळा. महत्त्वाचे निर्णय टाळा. व्यावसायिकदृष्टय़ा कोणावर अवलंबून राहू नका. खर्च कमी करा. कौटुंबिक वाद टाळा. आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया देणे त्रासाचे राहील. स्वत:हून स्वत:ची अडचण वाढवू नका.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा वाटचाल चांगली राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामाचा व्याप वाढेल. आर्थिक काटकसर करा. दिनांक १ व २ या दोन दिवसांत कारण नसताना स्पष्ट बोलण्याची वेळ येणार आहे, ही गोष्ट आता तुम्हाला माहित झाली आहे. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवले तर ही परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. त्यामुळे सहनशीलता वाढवा म्हणजे त्रास होणार नाही. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घातलेले चांगले राहील. खर्च कमी करा. कौटुंबिक वाद टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.
मिथुन : कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. स्वत:ची कामे स्वत: करणे योग्य राहील. व्यावसायिकदृष्टय़ा कोणत्याही व्यवहारासाठी वचनबद्ध राहू नका. व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नये. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. राजकीय क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. दिनांक ३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. जे दिवस चांगले आहेत, त्या दिवसांत रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. त्यासाठी तुम्ही कुठे कमी पडू नका.
कर्क : कार्य सफल होईल. मग उशीर करून चालणार नाही. वटपौर्णिमेचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. नोकरदार वर्गाला कामाचा त्रास कमी होईल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. सप्ताहात सर्वच दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगले दिवस म्हणजेच संधी असते हे विसरू नका. जी कामे करायला घ्याल त्या कामाला यश मिळणार आहे. ज्या कामासाठी बरेच दिवस वाट बघावी लागत होती, कितीही खटाटोप केला तरी ती पूर्ण होत नव्हती, सध्या ती पूर्ण होणार आहे.
सिंह : आतापर्यंत केलेल्या गोष्टींचा योग्य परतावा मिळेल. सध्याची वेळ साथ देणारी आहे. वटपौर्णिमेचा दिवस सर्वासोबत अगदी आनंदात साजरा कराल. व्यवसायात होणारा संघर्ष कमी होईल. नोकरदार वर्गाला धाडसी निर्णय घेता येतील. आर्थिक प्रगती होईल. प्रत्येक दिवस चांगला की वाईट याचा विचार करण्याची ही वेळ नाही. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची ही वेळ आहे. ज्या ज्या वेळी ‘माझेच खरे’ अशी वृत्ती असते, त्या त्या वेळी वादाचे प्रसंग निर्माण होतात व समोरचा ऐकून घ्यायलाही तयार नसतो. सध्या ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा’ असे होणार आहे.
कन्या : काही वेळेला बौद्धिक क्षमता असूनही यश मिळत नसते. अशा वेळी काळ-वेळच चांगला नाही असेच म्हणावे लागेल. सध्या बौद्धिक क्षमतेचा खूप उपयोग होईल. व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्री व्यवहार चांगले होतील. नोकरदार वर्गाने कामाच्या बाबतीत मात्र समतोलता साधा. आर्थिक परिस्थितीत चांगले बदल होतील. समाजसेवा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा. कौटुंबिक वातावरण वादविवादाचे होणार नाही याची काळजी घ्या . दिनांक २८ रोजी एकच दिवस असा आहे की, केलेले नियोजन फसेल. त्यामुळे ही मानसिकताच ठेवा की, हा दिवस आपल्याला हुलकावणी देणारा आहे.
तूळ : दिनांक २९, ३०, ३१ या तीन दिवसांत जेवढे शांत राहता येईल तेवढे शांत राहा. रागावर नियंत्रण ठेवा. नियमांच्या चौकटीत राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. या तीन दिवशी शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा कमी बोललेले केव्हाही चांगले. एखादी गोष्ट नाही पटली तर सोडून द्या. स्पष्टवक्तेपणा टाळा. समोरच्याने आपले ऐकावे, ही अपेक्षा सोडून द्या. समोरच्याला काही समजावून सांगण्यापेक्षा आपणच आपली दिशा बदलून आपल्यात बदल केलेला चांगला राहील. त्यामुळे स्वत:ला त्रास होणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा घेतलेले निर्णय ऐन वेळी बदलावे लागतील
वृश्चिक : व्यावसायिकदृष्टय़ा इतरांची विचारपूस करण्यापेक्षा स्वत:च्याच व्यवसायात लक्ष घाला. नोकरदार वर्गाचे कार्य सफल होईल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दिनांक १, २ हे दिवस फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसांत कोणाशीही कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू नका. नाही तर काही गोष्टी त्रासाच्या होऊ शकतात. कारण नसताना वादाला कारणीभूत आपण होऊ शकतो. त्यामुळे शांत राहून हे दोन दिवस पुढे ढकला. त्यानंतरचा कालावधी चांगला जाईल.
धनू : व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची स्थिती अतिशय चांगली असेल. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला असेल. आर्थिकदृष्टय़ा सफलता मिळेल. दिनांक ३ हा दिवस तसा चांगला नाही. या दिवशी तेवढा आक्रमकपणा टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला म्हणजेच भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. या कालावधीत शुभ वार्ता कळेल. ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत आहात त्या गोष्टी पूर्ण होणार आहेत. जास्तीचे प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. अगदी सहजमार्गे कामे होणार आहेत.
मकर : व्यावसायिकदृष्टय़ा स्पर्धा असेल. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज घेऊन काम करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा यशाचे गणित चांगले जमेल. दिनांक २८ रोजी दिवस चांगला आहे असे म्हणता येणार नाही. या दिवशी झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. त्यामुळे हासुद्धा दिवस चांगला जाईल. या आठवडय़ात सर्व दिवसांचा कालावधी अनुकूल असेल. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचा आराखडा प्रथम तयार करा. त्या आराखडय़ानुसार कामे होत राहतील. त्यामुळे तुम्हाला काम करताना उत्साह वाढेल
कुंभ : व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. दिनांक २९, ३०, ३१ असा हा तीन दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. या दिवसांत ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ असे होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या कामात गुंतून राहा. त्यामुळे कोणताच त्रास जाणवणार नाही. येणाऱ्या तांत्रिक अडचणी या चढउताराच्या राहतील. वटपौर्णिमेचा दिवस चांगला जाईल. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील.
मीन : व्यावसायिक परिस्थितीत सध्या कोणताच बदल करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घातलेले चांगले. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. सध्या ‘माझेच खरे मीच बरोबर’ असे करण्यापेक्षा दोन गोष्टी दुसऱ्यांच्याही ऐकून घेण्याची क्षमता वाढवा. इतरांनी आपल्या प्रतिक्रिया विचारल्या तर न दिलेल्या चांगल्या. तुमचा दृष्टिकोन चांगला असला तरी समोरच्याला तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा बोलताना नियंत्रण ठेवा. वटपौर्णिमा भाग्यस्थानातून होत आहे, हा दिवस चांगला जाईल.