जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लीश मीडियम स्कूलची स्थापना केली. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या इयत्तेतील शिशुंची शाळा सुरू झाली. पारंपरिक पोषाख घातलेल्या वाद्य शहनाईच्या मंगलमय स्वरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक विद्यार्थ्याला गोड खाऊ, फुल देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा केला गेला. सर्व शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा जवळ फुग्यांनी आकर्षक सजावट केली होती. शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे तिलक लावून औक्षण केले. वर्ग खोल्या छान सजवून, विविध रंगी फुगे, कार्टुन्स लावून सुशोभित केल्या होत्या. शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळ्या काढून आवार सुशोभित करण्यात आला होता. आरंभी स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. आयोजित स्वागताचा कार्यक्रम स्कूलच्या हॉलमध्ये आयोजला होता. यावेळी पालकांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत आपल्या मुलांचे या शाळेत उत्तम भवितव्य घडेल यासाठी जैन परिवाराचे ऋण व्यक्त करण्यात आले. शाळेत सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनिअर्सचे गाणे, नृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून स्वागत केले. सूत्रसंचालन पल्लवी साळुंखे, हर्षा वाणी यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा संगिता पाटील सांगितली व आभरप्रदर्शन मनिषा मल्हारा यांनी केले.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेनुसार पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत व्हावे या नुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज दाडकर, रुपाली वाघ, अरविंद बडगुजर, सीमा गगवाणी, ज्ञानेश्वर सोनवणे, कोमल सलामपुरिया, योगिता सुर्वे, राजश्री कासार, भूषण खैरनार, मधु लुल्ला,पूजा पाटील, लिन्ता चौधरी, उज्ज्वला तळेले, सुकिर्ती भालेराव यांचा सहभाग होता.