पुणे (वृत्तसंस्था) सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. अंत्यदर्शन सकाळी ९.३० वाजता डॉन स्टुडिओ, कर्वे नगर पुणे इथे तर सकाळी ११ वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.
भावपूर्ण गाण्यांपासून ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांना संगीताचा साज चढवणारे प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत. पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल यासारख्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन नरेंद्र भिडे यांनी केले होते. चि व च. चि. सौ. का या रोमँटिक कॉमेडी पठडीतील चित्रपटात त्यांनी दिलेली सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या ओठी रुजली आहेत. याशिवाय हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, ६६ सदाशिव यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले. लव्हबर्डस् या थ्रिलर मराठी नाटकाचे पार्श्वसंगीतही नरेंद्र भिडे यांनी दिले होते. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. तर आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही ते काम करत होते. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही नरेंद्र भिडे यांच्यातील संगीतकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत त्यांनी अनेक चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. पुण्यातील डॉन स्टुडिओचे संगीत संयोजक आणि संचालक म्हणून ते कार्यरत होते.