नागपूर (वृत्तसंस्था) उमरेड तालुक्यातील मकरधोकडा जलाशयावर पिकनिकसाठी आलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा जलाशयात अंघोळ करताना पाण्याचा अंदाज चुकल्याने बुडून मृत्यू झाला. यापैकी एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. ही घटना ७ ऑगस्टला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. आयुष ईश्वर सातपुतळे (२२, रा. भिवी, ता. भिवापूर ) व निखिल भगत (२३, रा. नाळ, ता. भिवापूर) अशी मृतकांची नावे आहेत.
आयुष सातपुतळे, निखिल भगत, प्रज्वल दिलीप सातपुतळे (२४, रा. भिवी, ता. भिवापूर) आणि अनिकेत विजय कांबळे (२६, रा. सालेभट्टी, ता. भिवापूर) हे चारही मित्र सोमवारी दुपारच्या सुमारास पिकनिकसाठी मकरधोकडा जलाशयावर आले होते. त्यापैकी आयुष सातपुतळे आणि दुसरा निखिल भगत हे दोघे अंघोळ करण्याकरिता मकरधोकडा जलाशयात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज चुकल्याने ते दोघेही बुडायला लागले. त्यामुळे त्यांचे इतर दोन मित्र प्रज्वल सातपुतळे आणि अनिकेत कांबळे यांनी आरडाओरड केली. त्यांनी स्थानिक नागरिकांना बोलाविले. परंतु ते पोहोचण्यापूर्वीच आयुष आणि निखिल पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तत्काळ ताफ्यासह घटनास्थळ गाठले. दोघांचाही शोध घेतला. परंतु त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. शेवटी सायंकाळी चार वाजता आयुषचा मृतदेह आढळला तर निखिलचा शोध सुरू आहे. आज मंगळवारी देखील निखिलच्या मृतदेहाचा शोध सुरु होता.