गोंदिया (वृत्तसंस्था) मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील सिपेवाडा येथे घडली. ही घटना रविवारी (३ सप्टेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सुशील वासुदेव हटनागर (३८, रा. प्रभाग क्रमांक ११, लाखनी) असे मृतकाचे नाव आहे.
लाखनी येथील काही युवक सिपेवाडा येथील मामा तलावात पोहायला जात असायचे. घटनेच्या दिवशी सुशील हटनागर हे देखील आपल्या काही मित्रांसोबत पोहायला गेले. परंतू पोहताना खोल पाण्यात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने सुशीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविला. याप्रकरणी लाखनी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक श्रीकांत वाघाये करीत हे आहेत.
















