नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीच्या खोलीत प्रियकराला रंगेहात पकडल्यानंतर पती व त्याच्या दोन मित्रांनी युवकाचा खून केला. ही घटना मंगळवारी पहाटे इमामवाडा हद्दीतील रामबाग रोडलगत असलेल्या वस्तीत घडली. नितीन सोहनलाल रोहनबाग (३८, रा. गंगाबाई घाट), असे खून झालेल्या युवकाचे तर गब्बर उर्फ राजेश सौदान चव्हाण (४७, रा. इमामवाडा), बाबल्या संजय झांझोटे (३३) आणि अनिकेत श्रावण झांझोटे (२७, दोन्ही रा. सदर, नवीन वस्ती), अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गब्बर चव्हाण आणि बाबल्या झांझोटे या दोघांना पोलिसांनी अटक केली.
१५ दिवसांपासून पहिल्या पत्नीच्या खोलीवर राहायला !
गब्बर चव्हाण हा शासकीय रुग्णालयात नोकरीवर आहे. त्याला दोन बायका असून दोघींकडून दोन दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीला माहिती न होऊ देता त्याने नात्यातील तरुणीशी केले होते. नितीन रोहनबाग हा गब्बरचा मित्र आहे. त्यामुळे त्याचे घरी येणे-जाणे होते. गेल्या काही दिवसांपासून गब्बर आणि त्याची पत्नी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. पतीशी वाद झाल्यामुळे तो गेल्या १५ दिवसांपासून पहिल्या पत्नीच्या खोलीवर राहायला गेला होता.
तीन दिवस ठेवली पाळत !
यादरम्यान त्याच्या पत्नीचे नितीनसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांपासून नितीन आणि ती महिला खुलेआम घरी भेटायला लागले. पत्नीसोबत नितीनच्या प्रेमसंबंधाची खबर गब्बरला लागली होती. त्यामुळे तो संतप्त झाला होता. त्याने आपले सार्थीदार बाबल्या आणि अनिकेतच्या साह्याने मागील दोन दिवसांपासून पत्नीवर पाळत ठेवली. नितीन मध्यरात्री पत्नीच्या खोलीवर येतो आणि पहाटेच्या सुमारास परत जातो, याची तिघांनीही खात्री केली. त्यानंतर तिघांनी नितीनचा काटा काढण्याचे ठरविले.
नितीनसोबत पत्नी नको त्या अवस्थेत दिसताच केला निर्घुण खून !
मंगळवारी मध्यरात्री एक वाजता नितीन पत्नीच्या खोलीत घुसल्याची खात्री झाली. पहाटे चार वाजताच्या सुमारास गब्बर, अनिकेत आणि बाबल्या घरात घुसले. यावेळी नितीनसोबत पत्नी नको त्या अवस्थेत दिसली. त्यानंतर आरोपींनी चाकू, लाकडी दांड्याने व विटाने वार करून नितीनला जागीच ठार केले. नितीनला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी नितीनची पत्नी माधुरी रोहनबाग हिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. इमामवाडा पोलिसांनी आरोपी गब्बर चव्हाण आणि बाबल्या झांझोटे या दोघांना अटक केली आहे. तर अनिकेतचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबतचे वृत्त आज वृत्तपत्रांनी दिले आहे.
















