छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) नातेवाईकांना भेटायला निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात महिलेसह दीड वर्षांचा मुलगा जागीच ठार तर पती व दुसरा मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी ( १३ जून) रात्रीच्या सुमारास अंबड पाचोड मार्गावरील कानडगाव शिवारात झाला.
पूजा लखन जाधव (वय २२), डुगू लखन जाधव (दीड वर्ष, दोघे रा. वाकुळणी, ता. बदनापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर लखन कल्याण जाधव व त्यांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जालना येथील लखन जाधव मंगळवारी दुपारी आपल्या दोन्ही मुलांसह नातेवाइकांच्या भेटीसाठी दुचाकीवरून विहामांडवा गावाकडे निघाले होते.
दांपत्याची दुचाकी पाचोड मार्गावरील कानडगावजवळ आल्यावर अज्ञात कारने समोरून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात पूजा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना नागरिकांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी महिलेसह तिच्या दीड वर्षांच्या मुलाला मृत घोषित केले.
या अपघात मयत महिलेचा मोठा मुलगा आणि पती देखील गंभीर झाले होते. मोठ्या मुलावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात तर लखन जाधव यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एका अपघाताने हसत्या-खेळत्या जाधव परिवारावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. यावेळी नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते.