नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीने तिच्या दोन मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरी चोरी करून १३ लाख ६० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली आहे. शिवानी सुमित यादव (वय २४) असे चोरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर रजत डोंडलकर (वय २३) आणि हर्ष पानतावणे (वय २४) दोघे रा. रामटेक, अशी तिच्या मित्रांची नावे आहेत.
चोरीची ही घटना ३० जून रोजी दुपारी ३.३० ते ७.४५ वाजताच्या दरम्यान घडली होती. शिवानीने तिच्या दोन्ही मित्रांना सोबत घेऊन स्वतःच्याच घरात चोरीची योजना आखली होती. तिने मोबाइलने घराचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हॉट्सअॅपवर मित्रांना पाठविले. त्यानंतर तिने घटनेच्या दिवशी पती सुमित अशोक यादव (३३) याला गिट्टीखदान येथील नर्मदा कॉलनी येथील सासऱ्याकडे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आग्रह करून पाहुणचारासाठी नेले. जातांना घराला बाहेरून व्यवस्थित कुलूप लावून दोघेही गेले होते.
या दरम्यान, शिवानीचे दोन्ही चोर मित्र तोंडाला दुपट्टा बांधून आले. त्यांनी दाराचे कुलूप तोडून आत घुसून हॉलमधील आलमारी उघडून ६ लाख ७५ हजार रुपये रोख, ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, मंगळसूत्र, सोन्याचे झुमके आणि चांदीचे दागिने, असा एकूण १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज बॅगमध्ये गुंडाळून पसार झाले.
सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास जेव्हा पतिपत्नी घरी परतले, तेव्हा चोरी झाल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. सुमित यादव याने चोरी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताच पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. खुद्द सुमितच्या पत्नीनेच तिच्या दोन मित्रांच्या मदतीने हा धक्कादायक प्रकार केल्याचे उजेडात आले. विशेष म्हणजे शिवानी आणि सुमित यांचा प्रेमविवाह झाला आहे.
दोघांचे दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता सुमितने शिवनीसोबत प्रेमविवाह केला. त्यामुळे तिने पतीच्याच घरी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवानी यादव या संशयित आरोपी महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली. तिला न्यायालयात हजर करून ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. रजत डोंडलकर (२३) आणि हर्ष पानतावणे (२४, दोन्ही रा. रामटेक), अशी तिच्या आरोपी मित्रांची नावे आहेत. शनिवारीच त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. आता पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.