मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खच्चीकरणात अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळेच की काय, भाजपाच्या मुंबई कार्यालयापासून तर थेट नागपूरपर्यंतच्या पोस्टरपर्यंत फडणवीसांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरवरून चक्क अमित शाह यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.
साधारणपणे राज्य पातळीवरील कोणत्याही नेत्याच्या शुभेच्छा फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा याचे फोटो पाहायला मिळतात. मात्र, महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मुंबईपासून नागपूरपर्यंत फडणवीसांच्या शुभेच्छा पोस्टरवरून अमित शाहांचा फोटो गायब झाला आहे. देवेंद्र फडणवीस नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतील असा अंदाज फोल ठरवत भाजपाकडून मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. इतकंच नाही, तर मंत्रिमंडळाबाहेर राहण्याची घोषणा करणाऱ्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडल्यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं.
सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्टर्स व्हायरल होत आहेत. यात मुंबई भाजपा कार्यालयाबाहेरील पोस्टर, नागपूरमधील माजी महापौर संदीप जोशी यांच्या पोस्टर्सचा समावेश आहे. त्या पोस्टर्सवरून अमित शाह यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे फडणवीस समर्थकांकडून अमित शाह यांचा फोटो टाळून आपली नाराजी व्यक्त केली जात आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आधी मंत्रिमंडळाबाहेर राहण्याची घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेत्यांच्या आग्रहानंतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याबाबतच्या निर्णयाची माहिती स्वतः अमित शाह यांनी ट्वीट करत दिली. तेव्हापासून फडणवीस यांच्या राजकीय खच्चीकरणात अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप होतोय.
















