हैदराबाद (वृत्तसंस्था) लग्नकार्यात वऱ्हाडींना पंगतीत मटणाची नळीच वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची धक्कादायक घटना तेलंगणाच्या हैदराबादमध्ये घडली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे, तर मुलगा जगतियाल येथील आहे. नोव्हेंबर महिन्यात मुलीच्या घरीच साखरपुडा झाला. वधूपक्षाकडील लोकांनी पाहुण्यांसाठी मांसाहारी बेत ठेवला होता. परंतु जेवणात मटणाची नळी नसल्याची तक्रार वर पक्षातील लोकांनी केली. साखरपुड्यापूर्वी झालेल्या बोलणीत जेवणाच्या पदार्थामध्ये मटणाच्या नळीचा समावेश नव्हता, असा दावा मुलीकडील लोकांनी केला. परंतु इतका वाढला की अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना वाद मिटवण्याचा सल्ला दिला; परंतु ते पोलिसांनाही जुमानत नव्हते. बोलणी झाली तेव्हा मेन्यूत मटणाची नळी असेल, असे ठरले होते. परंतु मुलीकडील लोकांनी जाणीवपूर्वक मेन्यूतून मटण नळी रद्द करत आमचा अपमान केला, असे वरपक्षाचे म्हणणे होते. अखेर मुलाच्या कुटुंबीयांनी साखरपुडा अर्थात सोडत लग्न मोडल्याचे जाहीर केले. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.