भंडारा (वृत्तसंस्था) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने भंडारा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला ३ हजार रुपयांची लाच देणाऱ्या दोघांना रंगेहात अटक केली आहे. निवास ठाकरे (वय ४२), नंदकिशोर ठाकरे (वय २८) अशी आरोपींची नावं आहेत.
संबंधित प्रकार हा भंडाऱ्याच्या लाखांदूप पोलीस ठाणे येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस शिपायाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. पोलिसांनी वाळू तस्कर आरोपींवर कारवाई करत त्यांचे ट्रॅक्टर जप्त केलं आहे. हेच ट्रॅक्टर परत सोडविण्यासाठी आरोपी संबंधित पोलीस शिपायावर जबरदस्ती ३००० रुपयांची लाच देवून ट्रॅक्टर परत देण्याचा दबाव निर्माण करत होते. पण पोलिसाने वेळीच एसीबीकडे तक्रार केली.
पोलीस शिपायाच्या तक्रारीनंतर आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. संबंधित पोलीस कर्मचारी आरोपींसोबत फोनवर सगळ्या गोष्टींना सहमती देऊ लागला. फोनवर झालेल्या संभाषणानुसार अखेर आरोपी पोलीस ठाण्यात लाच देण्यासाठी आले. त्यांनी पोलिसाला लाच दिली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे लाच घेणाऱ्याला नेहमी अटक होत असताना लाच देणाऱ्याला अटक होण्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी, अशी चर्चा सध्या भंडाऱ्यात या कारवाईनंतर सुरु आहे.