मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मनसेने वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक पावित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?, असा सवाल मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना केला आहे. या आशयाचे एक बॅनरही मनसेने मातोश्रीबाहेर लावले आहे. या बॅनरमधून मनसेने उद्धव ठाकरेंना नववर्षाच्या शुभेच्छा देत, त्यांना वीजबिलाच्या आश्वासनाचीही आठवण करुन दिली आहे.
मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावलं आहे. मनसेच्या या बॅनरमध्ये वीज बिलांवरुन ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा उर्जामंत्री म्हणाले, मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? असा मजकूर लिहून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “#मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?” असेही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांना मनसेकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र मागील वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली. याबाबत आधी वीज बिलांमध्ये सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र तशी कोणतीही सवलत देण्यात आली नाही. लॉकडाउनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या. त्यामुळे सरकारने वाढीव वीज बिलांचा विचार करावा असं आवाहन मनसेने केलं होतं. तसंच भाजपानेही वारंवार लोकांना वाढीव वीज बिलांमधून सवलत द्यावी अशी मागणी केली होती. मात्र यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. आधी आश्वासन देण्यात आलं आणि नंतर घूमजाव करण्यात आलं. त्यामुळे मनसेने नव्या वर्षाच्या शुभेच्छांचं बॅनर लावत असतानाच त्याच बॅनरमधून मुख्यमंत्र्यांना वाढीव वीज बिलांवरुन प्रश्न विचारत टीका केली आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीजबिल माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर मनसेने दादर आणि माहीम परिसरात होर्डिंगबाजी करून राज्य सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली होती. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, आणि ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. शिवाय सोमवारी भेटूच, शॉकसाठी तयार राहा, असा इशाराही मनसेने उद्धव ठाकरेंना दिला होता.