मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधला आहे. फ्लेचर पटेल कोण ? त्याचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंशी काय संबंध आहे? असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे. फ्लेचर पटेल एनसीबीच्या तीन केसेसमध्ये पंच आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीसमोर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.
मी गेल्या वर्षभरातील एनसीबीच्या केसेसची माहिती घेतली. त्यात तीन केसेसची माहिती संदिग्ध वाटली. सीआर नंबर 38/20 सर्च ऑपरेशन करण्यात आलं. २५ नोव्हेंबर २०२०मध्ये छापा मारला. त्यात फ्लेचर पटेल पंच करण्यात आले. त्यानंतर सीआर नंबर 16/ 20मध्ये ९ डिसेंबर २०२० रोजी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यात फ्लेचर पटेल पंच आहे. तिसरी केस आहे सीआर नंबर 2/21 आहे. त्यानुसार २ जानेवारी २०२१ ला छापेमारी करण्यात आली. त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असं सांगता मग ते तुमचे फॅमिल फ्रेंड कसे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केली का? असा सवाल त्यांनी केला.
सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्याला बदनाम करण्याचं भाजपकडून कट कारस्थान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या केंद्रीय यंत्रणेबाबत भाष्य केले आहे. कारण राज्यातील गुप्तचर यंत्रणा त्यांना याबाबत माहिती देत असते. राज्याला बदनाम करण्याचं कट कारस्थान भाजपकडून सुरू आहे. फडणवीस यांचं नेहमीच खोटं बोला रेटून बोला हे काम सुरू असतं. नेमकं भ्रष्टाचारी कोण आहे हे हळूहळू समोर येईलच. त्यांना वाटतं असेल की सौ चुहे खा के बिल्ली हज को चली, परंतु आता त्यांनी लक्षात घ्यावं सत्य लवकरच समोर येईल, असं देखील नवाब मलिक म्हणाले.