जळगाव (प्रतिनिधी) आठ महिन्यांचा देवांशू सुनिल सोनवणे हा चिमुकला घरासमोरील शेकोटीत पडून गंभीर भाजल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारादरम्यान, नऊ दिवसांनी देवांशूने दि. २० रोजी अखेरचा श्वास घेतला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घडली असून, या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे वास्तव्यास असलेले सुनील सोनवणे हे पत्नीसह शेतीचे काम करतात. आठ महिन्यांपूर्वी त्यांना देवांशू नावाचा मुलगा झाला होता. ११ जानेवारी रोजी त्यांच्या घरासमोर शेकोटी पेटवण्यात आली होती, जिथे काही जण बसलेले होते. देवांशू वॉकरमध्ये खेळत-खेळत तिकडे गेला आणि तोल जाऊन थेट पेटत्या शेकोटीत पडला. या अपघातात त्याचा चेहरा ते पोटापर्यंतचा भाग गंभीर भाजला गेला, तसेच पायालाही दुखापत झाली. हा प्रकार घडताच आई-वडिलांनी तत्काळ धाव घेऊन देवांशूला बाहेर काढले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दाम्पत्याला मोठा धक्का
सुनील सोनवणे यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, आणि देवांशू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. देवांशूच्या आगमनाने घर आनंदाने भरून गेले होते. मात्र दुर्दैवाने या अपघाताने संपूर्ण कुटुंब आणि गाव शोकसागरात बुडाले आहे. पोटचा चिमुकला गमावल्याने सोनवणे दाम्पत्यावर मोठा आघात झाला आहे. नांद्रा खुर्दचे माजी सरपंच वासुदेव सोनवणे यांचा देवांशू हा पुतण्या असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.