मुंबई (वृत्तसंस्था) मंदिरे बंद असल्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय.
राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा झाली, त्यानंतर निदर्शने झाली. नुकताच भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला. मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले.
गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट आणली जात आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असं ते म्हणाले.