मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आज काशीफ खान आणि केवी गोसावी यांचे व्हाट्सअप्प चॅट शेअर करत समीर वानखेडे यांना सवाल केला आहे. काशिफ खानला प्रश्न का विचेरले जात नाहीत. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्यातील संबध काय?, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केलाय. तसेच व्हॉट्सअप संभाषणाचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.
नवाब मलिकांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी Whatsapp चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे चॅट्स केपी गोसावी आणि त्याचा खबरी यांच्यामधले असल्याचा दावा मलिकांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. हे चॅट्स शेअर करताना मलिक म्हणतात, “केपी गोसावी आणि खबऱ्यामधले हे चॅट्स आहेत. यामध्ये काशिफ खानचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. मग काशिफ खानची चौकशी का झाली नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध आहे? यावरुन कळतंय की कशाप्रकारे कॉर्डेलिया क्रूझ पार्टीला हजेरी लावणाऱ्या लोकांना अडकवण्याची तयारी सुरू होती. ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना आहे. त्यामुळे त्यांना आता बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत”.
काय आहे चॅट मध्ये
एनसीबी पंच के पी गोसावी आणि इन्फॉर्मर यांच्यातील वॉट्स एप चॅट नवाब मलिक यांनी शेअर केले आहे. या चॅटमध्ये बनीत, काशीफ आणि सोहेल अहमद यांचा फोटो अरेंज करण्यासाठी त्या खबऱ्याशी झालेल्या संवादातील उल्लेख आहे. त्यानंतर फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये काशीद खानच्या फोटोचाही समावेश आहे. तीन बस भरून लोक आले आहेत, अशीही माहिती चॅटमध्ये देण्यात आली आहे. या पार्टीला उपस्थितांपैकी काही लोकांचे कपडे आणि त्यासोबत नावांची विचारणा के पी गोसावी करताना दिसत आहे. त्यावर खबऱ्या हा बघून देतो असे सांगतो. जी नावे सांगितली आहेत ती कन्फर्म आहेत का असा सवाल के पी गोसावीने केला. त्यानंतर कपड्यांसह फोटो मिळाले तर त्या लोकांना पकडणे सोपे जाईल असाही संवाद आहे. सर्व अधिकारी प्रतिक्षेत आहेत.
कोण आहे काशिफ खान?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याआधीही काशिफ खानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ते यापूर्वी म्हणाले होते की, माझा प्रश्न असा होता की हा दाढीवाला कोण आहे? हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा भारतातला प्रमुख आहे. हा फॅशनच्या नावाखाली पॉर्नोग्राफी, ड्रग्स आणि सेक्स रॅकेटचा धंदा करतो.