नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील ८ राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी नीती आयोगाने येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना वॅक्सिन संदर्भात महत्वाची माहीती दिली. राज्यांनी लसीकरणाचा आरखडा तयार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोनाविरोधातील लढाई अजून सुरुच असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कोरोना वॅक्सिनची किंमत काय असेल ? कशी असेल ? किती डोस असतील हे अजून ठरले नाही असे पंतप्रधान म्हणाले. लस साठा करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज असून लस देण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल असेही ते म्हणाले. पण भारतातील लस अधिक सुरक्षित असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असेही त्यांनी सांगितले.