कोल्हापूर (वृत्तसंस्था) खते, बी- बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्यासाठी दुकान सुरू करण्यास परवाना देण्यासाठी ९ हजारांची लाच स्वीकारताना कसबा बावडा येथील जिल्हा अधीक्षक कृषी विभाग कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. सुनील जगन्नाथ जाधव (वय ५०, रा. सध्या गंगाधाम अपार्टमेंट, जाधववाडी, ता. करवीर, मूळ शाहूपुरी, सातारा), असे संशयित आरोपी कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराला खते, बी-बियाणे आणि कीटकनाशक यांची विक्री करण्यासाठी त्यांना दुकान टाकायचे होते. यासाठी लागणारा परवाना मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करून वरिष्ठांकडे पाठवण्याची जबाबदारी कृषी अधिकारी सुनील जाधव याच्याकडे होती. हे काम करून परवाना देण्यासाठी जाधव याने तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीने ९ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्याकडे तक्रार दिली. नाळे यांनी याबाबत पडताळणी केली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी मार्केट यार्ड येथे सापळा रचून तक्रारदाराकडून ९ हजारांची लाच स्वीकारताना सुनील जाधव यास रंगेहात पकडले.