मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकेल. तसेच मराठा समाजाचा न्याय हक्क मिळवून देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा आरोग्य आराखाडा तयार झालेला आहे. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्या राज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स निर्माण केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत उत्तर दिलं. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, ‘राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल, पण मागील वेळी आपण निर्णय घेतला होता तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो तेव्हा वकीलांची फौज तशीच्या तशी ठेवली, भूमिकाही बदलली नाही.’ ‘माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिलंय, आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचं ठरवलं असेल तर माहित नाही. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे. वेळोवेळी संघटनांबरोबर चर्चा चालू असते, अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर चर्चा करतात. ही लढाई सुरू असताना मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघालं माहित नाही. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही.’ असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.