जळगाव (प्रतिनिधी) भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अचानक बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथे घडली. अंजली विजय भामेरे (वय ४० वर्ष) असं मयत महिलेचं नाव आहे.
जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथे अंजली भामेरे या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुपारी अंजली यांना मोबाईलवर जळगावमध्ये राहणारा भाऊ रवी वडनेरे यांचा व्हिडीओ कॉल आला. फोनवर बोलता बोलता त्या घर झाडत होत्या. याचवेळी त्या अचानक जमिनीवर कोसळल्या. हे पाहून अंजली यांचा लहान मुलगा हर्षल धास्तावला. आई अचानक काम करता करता खाली कशी पडली हे पाहून त्याने जोरात आरडा ओरडा करायला सुरुवात केली.
आरडा ओरडा ऐकून घरातील नातेवाईकांनी तसेच शेजाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. नातेवाईकांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले. परंतू तोपर्यंत अंजली भामेरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉक्टरांनी अंजली भामेरे यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत अंजली यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अंजली यांच्या पतीचा दीड वर्षांपूर्वी मोठा अपघात झाल्याने त्यांना दिव्यांगत्व आले आहे.