नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाला आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. तर एका ट्विटमधून प्रशांत भूषण यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”, असा टोला प्रशांत यांनी ट्विटमधून लगावला आहे.
“अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगाणारे लोकं आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत,” असं ट्विट प्रशांत भूषण यांनी केलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही याच तुकडे तुकडे गँगच्या वक्तव्यावरुन भाजपावर निशाणा साधला. “भाजपाच देशातील खरी तुकडे तुकडे गँग आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलादरम्यान देशाला तोडण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही बादल म्हणाले आहेत. “भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदूंना मुस्लीमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे,” असंही बादल यांनी नमूद केलं. “आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि शेतकरीही. तुम्हाला नक्की काय हवं आहे? भाजपा सरकारनं आपल्या अहंकारातून मागे हटून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे,” असंही बादल यांनी म्हटलं आहे. ज्यांनी नवा कायदा तयार केला त्यांनी आयुष्यात कधी शेती केली नाही. केंद्रातील मोदी सरकार हे अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मोदी सरकार लोकांना धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.