पुणे (प्रतिनिधी) – खराडी येथील पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याची संपूर्ण कारवाई संशयास्पद असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे कोणी व्हायरल केली, याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शप गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बुधवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून केली.
या पार्टी प्रकरणामध्ये खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. या पार्टीमध्ये सुमारे ४२ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मात्र, डॉ. खेवलकर यांना अडकवण्यासाठी पोलिसांनी हेतुपुरस्सर ही कारवाई केली असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. रोहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री शहर गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेऊन निःस्पृहपणे तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. डॉ. खेवलकर यांची व अन्य आरोपींची ओळख नव्याने झाली. पार्टीमध्ये उपस्थित असलेले दोनजण अनाहूत होते. तसेच, तेथे आलेल्या दोन तरुणींचा पार्टीतील सहभाग अत्यंत संशयास्पद आहे. या तरुणींना अन्य कोणीतरी तेथे पाठवले होते व त्या आल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी तपासणी करण्यापूर्वीच या तरुणींनी पर्समधील अमली पदार्थ काढून पोलिसांकडे देणे, हे संशयास्पद आहे.