नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मी संसदेत अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? माझ्या या साध्या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि मोदी का देत नाही? असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. 2019 मधील वक्तव्यानंतर खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी यांच्या संबंधावरूनही टीका केली. तसेच कायमचे अपात्र केले तरी मी प्रश्न विचारणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. मी लोकसभा सभापती यांच्याशी चर्चा केली. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, हे मी विचारत राहणार. मी कोणालाही घाबरत नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कितीही कारवाई झाली तरी मी सरकारला प्रश्न विचारणार. आमचा फक्त एकच सवाल केला आहे. अदानीची शेल कंपनी आहे. त्यात 20 हजार कोटी कोणी गुंतवले? ते अदानीचे पैसे नाहीत. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेस आहे. पैसे इतरांचे आहेत. ते पैसे कुणाचे आहेत? मीडिया रिपोर्टमधून माहिती घेऊन मी संसदेत पुरावे दिले. मी अदानी आणि मोदी यांच्या संबंधावर भाष्य केलं. दोघांचे संबंध जुने आहेत.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांचे नाते आहे. त्यांच्या संबंधाचे फोटो दाखवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळेच अदानी यांच्या बोगस कंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली. ही गुंतवणूक कोणी केली, हा प्रश्न मी वारंवार विचारत आहे. त्यामुळे आपले पितळ उघडे पडले याची भीती पंतप्रधान मोदी आणि भाजप यांना वाटत आहे. त्यामुळेच माझी खासदारकी रद्द करण्यात आली,असाही आरोप राहुल गांधींनी केला आहे.
माझ्या लोकसभेतील भाषणाचा भाग वगळण्यात आला. अदानी यांना संरक्षण विभागात आणि देशभरातील विमानतळांचे कंत्राट नियम बदलून देण्यात आले. मी या सगळ्याविषयी प्रश्न विचारायला गेलो तर मला बोलून दिले जात नाही. माझ्या भाषणाचा भाग का वगळला, याविषयी मी लोकसभा अध्यक्षांना दोनवेळा चिठ्ठ्या दिल्या, पण उत्तर आले नाही. त्यानंतर मी लोकसभा अध्यक्षांच्या दालनात गेलो. मला बोलून का दिले जात नाही, असा प्रश्न त्यांना मी विचारला. त्यावर लोकसभा अध्यक्ष फक्त हसले. मी काहीच करू शकत नाही, असे ओमप्रकाश बिर्ला यांनी म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.