मुंबई (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपसलेली उपोषणाची तलावर अखेर म्यान केल्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या या निर्णयावरुन आता शिवसेना, राष्ट्रवादी अशा पक्षांतील नेत्यांनी अण्णांवर निशाणा साधला असून, अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला कळायला हवीत,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या मनधरणीला अखेर यश आलं आणि ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून उचललेलं उपोषणाचं पाऊल मागे घेतलं. त्यांच्या या निर्णयावरुन आता शिवसेना, राष्टवादी अशा पक्षांतील नेत्यांनी अण्णांवर निशाणा साधला असून, ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत असाच प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्यामुळं अण्णांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं कारण पुढे आलं. पण, उपोषणापूर्वीच माघार घेतल्यामुळं अण्णांची कृषी कायद्यांबाबत नेमकी काय भूमिका आहे हे सर्वांनाच कळायला हवं असा प्रश्नार्थक टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तील अग्रलेखातून अण्णांवर निशाशा साधण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी उपोषण जाहीर करुन पुन्हा माघार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही असा खोचक टोलाही लगावण्यात आला आहे. अण्णा हजारेंनी उघडपणे भूमिका घेण्याची गरज आहे. ९०-९५ वर्षांचे शेतकरी गाझियाबादच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशा वयोवृद्ध शेतकऱ्यांना नैतिक बळ देण्यासाठी आता अण्णांनी उभं राहायला हवं. राळेगणात बसून भाजप पुढाऱ्यांबरोबर सोंगट्या खेळण्यात आता हशील नाही. प्रसंग युद्धाचाच आहे व युद्ध आता गावातून व मंदिरातून होणार नाही. मैदानात उतरावे लागेल. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपाच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.