नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला खिंडार पडल्याचा गंभीर प्रकार घडला. यावर आता महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा करणारं ट्विट केलंय. मोदींना अडवणाऱ्या आंदोलकांनी भाजपचा झेंडा का धरला आहे? हे लोक कोण आहेत? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला खिंडार पडल्याचा गंभीर प्रकार आज घडला. सुरक्षेतील या त्रुटीसाठी केंद्राने राज्य सरकारला जबाबदार धरले असून गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून तत्काळ अहवाल मागविला आहे. या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे युद्ध भडकले आहे. काँग्रेसचे खुनी इरादे निष्फळ ठरले, अशी तोफ भाजपने काँग्रेसवर डागली तर, गर्दीअभावी पंतप्रधानांची सभा अयशस्वी ठरणार होती या भीतीपोटी भाजपची ही बहाणेबाजी सुरू असून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणे थांबवावे, राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.
नवाब मलिक यांनी एका व्हिडीओचे ट्विट रिट्वीट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक राज्यामध्ये सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच आयबीचे डेप्यूटी डायरेक्टर अथवा संयुक्त डायरेक्टर रँकचे ऑफिसर तैनात असतात. पंजाबच्या आयबी अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत आधीच माहिती मिळाली नव्हती का? या व्हिडीओमध्ये पाहा आंदोलनकर्ते घोषणा देत मोदींच्या किती जवळ गेले आहेत. असं या व्हिडीओला ट्विट करणाऱ्या व्यक्तीने लिहलं आहे.
हा व्हिडीओ रिट्विट करत नवाब मलिकांनी विचारलंय की, आंदोलकांनी भाजपचा झेंडा का धरला आहे? हे लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी घोषणा देणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती भाजपचा झेंडा घेऊन उभा असलेला दिसून येतो आहे.