मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना काळात मास्क घालणं सर्वांना बंधनकारक केले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र अनेकदा विनामास्क वावरताना दिसत असतात, यातच आज नाशिक दौऱ्यावेळीही राज ठाकरेंनी मास्क परिधान केला नव्हता, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे, मास्क नेमकं का वापरायचं नाही? याचं ठोस कारण सांगावं असं आवाहन राऊतांनी राज ठाकरेंना केले आहे.
मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलंय. राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आलंय. आजही त्यांनी नाशिक दौऱ्यात मास्क परिधान केलेलं नव्हतं. तसंच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा ‘विना मास्क इशारा’ चर्चिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या वर्तनावर टोलेबाजी केली. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहेत. त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सर सलामत तो पगडी पचास तसं आधी जीव महत्वाचा आहे. इस्पितळात गेल्यावर जे भोगावे लागते ना…तेव्हा वाटते अरेरे ऐकायला हवे होते…मास्क घालायला हवे होते. मग आधीच ऐका ना, असा सल्ला राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला.
कोरोनाविरुद्ध ही लढाई लढताना आमच्याकडूनही कधी ढिलाई होते, परंतु तसं चालत नाही, मी अनेकदा नियमांचे पालन करतो, परंतु मास्क खाली येताच मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते, कारण त्यांनी असं पाहिलं तर ते ताबडतोब चंपी करतात, प्रेमाने असो वा काळजीपोटी..मास्क घालण्याचा आग्रह कायम असतो असंही संजय राऊतांनी सांगितले.
MP असले म्हणून काय झालं? पोलीस अधिकाऱ्याचं बाणेदार उत्तर
काही दिवसांपूर्वी दिल्लीत मला स्वत:ला मास्क न वापरण्याचा दंड भरावा लागला आहे, विमानतळावर गाडीतून जात असताना फोनवर बोलण्यासाठी मी मास्क थोडा खाली केला, तेव्हा पोलीस पथकाने मला पकडलं, माझी गाडी बाजूला घेतली, तेव्हा माझ्या पीएने सांगितलं, MP साहेब आहेत, त्यावर पोलीस अधिकाऱ्यानं MP असले म्हणून काय झालं असं बाणेदार उत्तर दिलं, माझ्याकडून २ हजारांची पावती फाडली, मी नियम मोडला होता त्यामुळे मी लगेच दंड भरला असा किस्साही संजय राऊतांनी सांगितला.