नाशिक (वृत्तसंस्था) नात्यातीलच महिलेशी पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नीने डोक्यात मुसळी मारत मुलाच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी फाटा येथे घडली. दादाजी गवळी ( 41, समृद्धी प्लाझा, यशवंतनगर दामोदर चौक, पाथर्डी फाटा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अंबड येथील कंपनीत कामाला असलेले दादाजी गवळी पत्नी सुनीता मुलगा विशाल (वय २१) व २० वर्षीय मुलीसमवेत समृद्धी प्लाझा, यशवंतनगर, दामोदर चौक, पाथर्डी फाटा येथे राहत होते. त्यांचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सुनीता यांना होता. यावरून आठ महिन्यांपूर्वी झालेला त्यांच्यातील वाद पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोहोचला होता. त्यावेळी, पुन्हा असे घडणार नाही, असे आश्वासन देत दादाजी गवळी यांनी समझोता केला होता.
परंतु पुन्हा गवळी यांनी बाहेरील महिलेश अनैतिक संबंध सुरूच ठेवल्याचा प्रकार त्यांची पत्नी सुनीता गवळी यांना कळाली. तसेच गवळी घरात पैसे देत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. या वादातून रविवारी रात्री पती-पत्नीमध्ये झालेले भांडण टोकाला गेले. दादाजी गवळी हे गाढ झोपेमध्ये असताना सुरुवातीला सुनीता व विशाल यांनी त्यांना गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीमध्ये मुलाने त्यांचे पाय धरून ठेवले व पत्नीने गवळी यांच्या डोक्यात थेट मुसळी घालून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. या घटनेनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सुनीता गवळी व मुलगा विशाल गवळी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.