सवना (वृत्तसंस्था) सेनगाव (Sengaon) तालुक्यात सवना येथे एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीला स्वयंपाक करण्यासाठी उशीर झाला म्हणून हात पाय बांधून रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंडलिक शिवराम नाईक असं या आरोपी पतीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, पत्नी सुंदराबाईचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे.
सुंदराबाई कुंडलिक नायक असं हत्या झालेल्या ७८ वर्षीय महिलेचं नाव आहे. तर कुंडलिक शिवराम नायक असं अटक केलेल्या ८० वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. नायक दाम्पत्याला एकूण पाच मुली असून पाचही जणींचं लग्न झालं आहे. त्यामुळे मृत सुंदराबाई आणि आरोपी दोघेच सेनगाव तालुक्यातील सवना येथे वास्तव्याला होते.
पत्नीवर रॉकेल ओतून पेटवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुंदराबाई यांना स्वयंपाक करायला उशीर झाला होता. जेवण बनवायला उशीर झाल्याने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. याचा प्रचंड राग आरोपी कुंडलिकला आला होता. यातूनच आरोपीनं २५ फेब्रुवारी रोजी रात्री एकच्या सुमारास आपल्या पत्नीचे हात-पाय बांधले. त्यानंतर आरोपीनं पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं. मध्यरात्री घरात आग लागल्याचं पाहून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पत्नीला पेटवून झोपेचं सोंग
यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी मृत सुंदराबाई यांच्या अंगाला आग लागल्याचं गावकऱ्यांना दिसलं. तर आरोपी कुंडलिक हा घरातच झोपेचं सोंग करताना दिसला. हा प्रकार घडताच गावकऱ्यांनी तातडीनं सुंदराबाई यांना वाशिम येथील रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, २६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या दुर्दैवी घटनेत सुंदराबाई ८० टक्के भाजल्या होत्या. आरोपीच्या सर्वात लहान मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.