पिंपरी (वृत्तसंस्था) शहरातील बावधन परिसरात विवाहित महिलेने आपल्या पतीच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधांची(extramarital affairs) भांडाफोड केली आहे. संबंधित पीडित पत्नीने पतीच्या वागणायचा संशय आल्याने पतीच्या चारचाकी वाहनात जीपीएस (GPS)बसवले. त्यामुळेच पतीच्या रंगेल कारनाम्यांची भांडाफोड झाली व पतीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटले. पती एका महिलेसोबत हाॅटेलमध्ये थांबला असल्याचे यातून उघड झाले.
अरिफ अब्दुल मांजरा (वय ४१, रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. आरोपी अरिफ याच्या पत्नीने याप्रकरणी १ फेब्रुवारी २०२२ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आणि आरोपी अरिफ यांचा २००५ मध्ये सुरत येथे विवाह झाला. लग्नानंतर फिर्यादीचा आरोपी पती अरिफ हा कामानिमित्त बेंगळुरू येथे जात होता. त्याचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे फिर्यादीने २१ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपी पती अरिफच्या चारचाकी वाहनामध्ये जीपीएस डिव्हाईस लावले. त्यानंतर आरोपी पतीचे लोकेशन बावधन येथील हॉटेल व्हिवा, असे जीपीएसवरून दिसून आले. त्यामुळे फिर्यादीने इंटरनेटवरून हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळवला. अरिफ हॉटेलमध्ये आले आहेत का, अशी चौकशी हॉटेलमध्ये फोन करून केली. त्यावेळी अरिफ आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्याचे हॉटेलमधून समजले.
फिर्यादी महिलेने नोव्हेंबर २०२० मध्ये हॉटेलमध्ये जाऊन माहिती घेतली. आरोपी पती अरिफ याच्यासोबत एक महिला फिर्यादी यांचे आधारकार्ड वापरून राहिल्याचे फिर्यादी महिलेला समजले. त्यामुळे फिर्यादी महिलेने हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ती महिला फिर्यादीच्या पतीसोबत असल्याचे उघड झाले. फिर्यादीने त्यांच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड करून घेतले. आरोपींनी तोतयागिरी करून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.