जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात जळगाव शहर, पाचोरा, एरंडोल, चोपडा, रावेर, अमळनेर येथे आघाडीसह महायुतीत बंडखोरी झाली आहे. अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्यास काही ठिकाणी दोन्ही आघाड्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ‘बंडखोरांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बंडखोरां’च्या भुमिकेमुळे अनेकांची विजयाची ‘गणिते ‘चुकणार असल्याने नेत्यांना देखील या बंडखोरांच्या मनधरणीसाठी करावी लागणार आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोणते बंडोबा थंड होणार? कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार? तर कोण निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार? हे स्पष्ट होणार आहे.
यंदा विधानसभा निवडणूकीत मोठी चुरस पहावयास मिळत आहे. महायुती व महाविकास आघाडीत बऱ्याच मतदार संघात ‘काटे कि टक्कर’ पहावयास मिळणार आहे. त्यामुळे स्वपक्षाच्या बंडखोरीचा ज्या त्या पक्षांना जबर बसणार आहे. त्यामुळे तीन दिवसात युतीसह मविआचे नेते बंडखोरी कशी मोडीत काढतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सर्वाधिक बंडखोरी भाजपच्या उमेदवारांनी केली असल्यामुळे संकटमोचक तथा मंत्री गिरीश महाजन यांचा लागणार सर्वाधिक कस लागणार आहे.
रावेरची जागा मविआकडून काँग्रेसला सुटली आहे. येथून धनंजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर काँग्रेसकडून इच्छुक असलेले रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद यांनी बंडखोरी केली आहे. दारा मोहंमद यांच्या मनधरणीसाठी जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांनी फोनवरून संपर्क साधून त्यांची मनधरणी सुरु केली आहे.
चोपड्यातून शिंदे गटाचे प्रा. चंद्रकांत सोनवणे हे उमेदवार आहे. मात्र शरद पवार गटाचे डॉ. चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष अर्ज भरून निवडणूक लढविण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याकडून बारेलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जळगाव शहरात भाजपचे राजूमामा भोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी केली असुन मविआला देखील बंडखोरीचा सामना करावा लागत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे रिंगणात आहे. डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, सोनावणे हे आपल्या उमेदवारी ठाम असल्यामुळे आता गिरीश महाजन यांचा चांगलाच कस लागणार आहे. दुसरीकडे तर कुलभूषण पाटील यांच्यासोबतही काही शिवसेना नेते उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा करत आहेत. परंतु मला पक्षश्रेष्ठी माघार घ्यायला सांगूच शकत नाही, असे कुलभूषण पाटील यांचे म्हणणे आहे.
पाचोरा मतदारसंघात महायुतीकडून शिंदेसेनेचे आ. किशोर पाटील हे उमेदवार आहे. मात्र भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ हे देखील उमेदवार असल्याने महाविकास आघाडीची देखील डोकेदुखी वाढली आहे. अमोल शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन तर दिलीप वाघ यांच्यासोबत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा माघारी संदर्भात संवाद सुरु आहे. परंतु दिलीप वाघ यांचे माघार घेण्याचे चिन्ह फारच कमी दिसत आहेत. दुसरीकडे महायुतीच्या मेळाव्यात चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी बंडखोरांचा योग्यवेळी बंदोबस्त केला जाईल, असा थेट इशारा दिला होता. तसेच आम्ही बंडखोरांची समजूत काढून जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीचे उमेदवार जिंकणार, असेही म्हटले होते.
एरंडोल मतदार संघात शिंदे सेनेचे अमोल पाटील हे उमेदवार आहे. तेथे भाजपाचे माजी खासदार ए.टी. पाटील यांनी बंड पुकारले आहे. मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील असुन दुसरीकडे शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने व नानाभाऊ महाजन हे देखील रिंगणात आहे. माजी खासदार ए.टी. पाटील यांची राज्यातील भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मनधरणी सुरु आहे.
अमळनेर मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडखोरी करत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिरीष चौधरी यांची मनधरणी भाजपकडून सुरु आहे किंवा नाही?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीय. परंतु शिरीष चौधरी हे आपल्या उमेदवारीवर ठाम असून प्रचारातही ते खूप पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे शिरीष चौधरी यांचे बंड शांत करणे, सध्या तरी अशक्य दिसत आहे.