नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बिडेन विजयी झाले आहेत. परंतु,विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही पराभव मान्य करण्यास तयार नाही. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प सत्तापालट करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे.
ट्रम्प सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवून त्या जागी आपल्या निष्ठावान लोकांची निवड केली आहे. पेंटागॉन ही अमेरिकेची सर्वोच्च संरक्षण संस्था आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संरक्षण सचिव मार्क एस्पर यांना हटवले असून त्याजागी राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्राचे संचालक क्रिस्टोफर मिलर यांना नियुक्त केले आहे. या बदलाकडे बंडाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
बिडेन यांच्या विजयावर ट्रम्प सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोपही ट्रम्प करत आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या सहमतीने परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी शांतीपूर्ण वातावरणात सत्ता हस्तांतरण केले जाईल. आणि ट्रम्प प्रशासन आपला दुसरा कार्यकाळ सुरु करेल, असे म्हंटले आहे.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची भाची मेरी एल ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे अमेरिकेत सत्तांतर होण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत ज्यो बिडेन बायडेन कायदेशीर आणि निर्णायकपणे जिंकले. डोनाल्ड आणि त्यांचे लोक कितीही खोटे बोलले तरी काहीही बदलणार नाही. सतर्क राहा हा एक सत्तापालट करण्याचा प्रयत्न आहे, असा इशारा मेरी एल ट्रम्प यांनी दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे स्पष्ट निकाल लागूनही विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हा निकाल मानायला तयार नाहीत. या संबंधात त्यांनी जो अडेलपणा स्वीकारला आहे तो लाजीरवाणा आहे, अशी प्रतिक्रिया नियुक्त अध्यक्ष बायडेन यांनी व्यक्त केली आहे.