जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहराच्या विकासासाठी दृढ दृष्टिकोन आणि सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित नेतृत्व असलेले माजी महापौर प्रदीपभाऊ रायसोनी हे शहराच्या जनतेसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरातील प्रत्येक विभागात केलेल्या विकासकामांमुळे त्यांना लोकांमध्ये एक विशेष स्थान मिळाले आहे. आता, प्रदीप भाऊ रायसोनी यांच्या पुनःराजकारणात सक्रिय होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर राजकीय क्षेत्रातील पडद्याआड राहून राजकीय गणिते फिरवणारे अमित पाटील यांनी देखील यासाठी पुढाकार घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
एका सोशल मीडियाच्या ग्रुपवर अमित पाटील यांनी जळगाव शहराला प्रदीप रायसोनी यांच्या सारख्या विकासाच्या व्हिजन असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत मांडले आहे. भाजपाला कधी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालं होतं, मात्र त्यांचा राज्यातील राजकारणातील सक्रिय सहभाग पाहता, त्यांना महापालिकेच्या कामकाजाकडे लक्ष देण्याची वेळ मिळाली नाही. यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनीही मागील काळात फुटलेल्या गटांना एकत्र आणण्यासाठी प्रदीप रायसोनी यांसारख्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रदीप रायसोनी यांच्यासाठी सर्वसामान्य जनतेची आणि शहरातील उद्योजकांचीही तीव्र इच्छा आहे. त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर मात करून शहराची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी प्रदीप रायसोनी यांना पुढे येणे आवश्यक असल्याचे अमित पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीने तयारीला लागले आहे. गत काळात ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली महापालिका एकहाती चालवली गेली, आणि त्यानंतर माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला वेगळा आयाम मिळाला. रायसोनी यांच्या नेतृत्वामुळे महापालिका प्रशासनावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली होती. 2023 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ‘आपण निवडणूक लढू शकतो का?’ अशी विचारणा केली होती, परंतु त्या वेळी त्यांनी निवडणुकीत सहभाग घेतला नाही. खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून 1985 ते 2007 दरम्यान रायसोनी यांनी महापालिकेत अनेक जबाबदाऱ्या पार केल्या. यावेळी महायुतीच्या नेत्यांमध्ये रायसोनी यांच्या नावावर चर्चा सुरू झाली असून, महापालिकेच्या भवितव्यासाठी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपा आणि शिवसेनेचे आलटून पालटून सत्तेचे समीकरण बदलले असून, महायुती आता ‘चाणक्य’ शोधण्यात व्यस्त आहे.
माजी महापौर प्रदीप रायसोनी यांना जळगाव महानगरपालिकेचा गाढा अभ्यास असून शहराच्या विकासासाठी आणि निवडणुकीसाठी योग्य व्यवस्थापनाची उच्च क्षमता आहे. महापालिका प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरतो. नवीन राजकीय समीकरणानुसार, प्रदीप रायसोनी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले तरी, ते समन्वयकाच्या भूमिकेतून महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवतील, अशी चर्चा सुरू आहे. पडद्या आड राहून मोठी राजकीय गणित फिरणारे अमित पाटील यांनी उघडपणे प्रदीप रायसोनी यांची बाजू मांडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.