भुसावळ ः प्रचार कार्यालयाचे उद्घाटन एक दिवसांपूर्वीच होणार होते मात्र जागा मालकाला धमक्या देण्यात आल्या त्यामुळे जागा बदलावी लागली मात्र मी धमक्यांना अजिबात घाबरणार नाही, पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरली असून निश्चित विजयी होईल, असा विश्वास भुसावळातील अपक्ष उमेदवार स्वाती कुणाल जंगले यांनी व्यक्त केला. जामनेर रोडवरील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जंगले बोलत होत्या.
शहराच्या विकासासाठी आपली उमेदवारी
भुसावळ शहराचा चौफेर विकास व्हावा यासाठी आपली उमेदवारी असून समाज आपल्या पाठीशी आहे. आपल्या उमेदवारीमुळे अनेकांच्या तंबूत घबराट पसरली असून विविध मार्गाने आम्हाला त्रास दिला जात आहे मात्र या धमक्यांना मी अजिबात घाबरणार नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, कालच आमच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते मात्र जागा मालकाला धमकी मिळाल्याने त्यांनी प्रचार कार्यालयासाठी जागा दिली नाही त्यामुळे ऐनवेळी जामनेर रोडवरील भिरूड हॉस्पीटलवरील जागेचा पर्याय निवडावा लागला.
लेवा समाजासह अन्य समाज पाठीशी
भुसावळातील लेवा समाजासह अन्य समाज आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास स्वाती जंगले यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच शहरात कामांना सुरूवात झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. निवडणुकीतून अर्ज बाद ठरलेल्या अपक्ष उमेदवार प्रीती तोरण महाजन यांचे पती तोरण महाजन यांनीही स्वाती जंगले यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान, प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांना नमन केल्यानंतर शहरातून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली.