मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर शाळा पुन्हा बंद होणार का? कॉलेजेसच्या परीक्षा होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्दयार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच वर घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे.” असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.
मुंबईत कोरोना वाढतोय
मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 961 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आता पुन्हा मृत्यू होऊ लागले आहेत. कोरोनामुळे मुंबईत गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या 4880 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.