पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील बाद ठरवलेला उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने पात्र ठरवल्याने डॉ. पाटील यांची पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात परत आले आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात परतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी पाचोऱ्यातील मेळाव्यात या निवडणुकीत पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल, अशी घोषण करत डॉ. पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा अर्ज विरोधकांनी हरकत घेतल्याने बाद ठरला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज पात्र ठरवल्याने ते उमेदवार म्हणून पुन्हा एंट्री झाली आहे. त्यामुळे राजकीय चुरस वाढली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीने मेहू येथे मेळावा घेतला. या वेळी माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, आमदार अनिल पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे व प्रमुख पदाधिकाऱ्यांची या मेळाव्याला उपस्थिती होती. डॉ. सतीश पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या पॅनलला मोठे पाठबळ मिळाल्याच्या भावना उपस्थितांमध्ये होत्या. आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील या दोन्ही पिता-पुत्रांवर या वेळी आरोपांची झोड उठवण्यात आली.