धुळे (वृत्तसंस्था) : शिंदे गटासोबत युती होऊन राज्याचा कारभारदेखील सुरू झालेला आहे. आगामी विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप आणि शिंदे गटाची युती कायम राहणार आहे. पूर्ण ताकदीनिशी आम्ही येणाऱ्या निवडणुकीत सोबतीने सहभाग घेऊ. जागा वाटपात आमच्या आणि त्यांच्या वाट्याला ज्या जागा जातील त्या सर्व जिंकून आणण्यासाठी प्रयत्न राहतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यांशी संपर्क सुरू केलेला आहे. त्यात धुळे हा तेरावा जिल्हा आहे. संघटनात्मक रचना करण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण काय करता येईल, याचा विचार होणार आहे. केंद्राच्या असो वा राज्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या जातील. पक्षातील कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार आहे. पालकमंत्र्यांची नेमणूक बाकी असून, ते अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्याकडे लक्ष देऊ.