यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या यावल आगारातील एका वाहकाच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने बाकी असताना एसटी बसमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ७ रोजी घडली. दिलीप वासुदेव नाले (वय ५७, रा. देशमुख वाडा, यावल), असे मृत वाहकाचे नाव आहे.
यावल आगाराचे वरिष्ठ वाहक दिलीप नाले हे ७ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे यावल ते भुसावळ एसटी बसने प्रवासी सेवा देत होते. अचानक ५.३० वाजेच्या सुमारास त्यांना अंजाळे गावापासून अस्वस्थ जाणवू लागले. बसमध्येच नाले यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना तत्काळ भुसावळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेचे वृत्त कळताच यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह भुसावळात धाव घेतली.
दरम्यान, दिलीप नाले हे मागील २६ वर्षापासून यावलच्या आगारात वाहक पदावर कार्यरत होते. नाले यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या दोनच महिन्यांचा कालावधी राहिला असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.