मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. तसेच बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता, असंही मलिक म्हणाले.
मलिक म्हणाले की, खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं. खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असं ते म्हणाले. खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असं मलिक म्हणाले.
मलिक म्हणाले की, बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडलं होतं. तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जातो त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे असंही मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, मुन्ना यादव, हैदर आझम, रियाझ भाटी यांच्याशी कसे संबंध आहेत ते फडणवीसांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले. केंद्राच्या एजन्सीला आमचं आवाहन आहे की खोट्या नोटांबाबत पुन्हा एकदा चौकशी व्हावी. नवाब मलिक म्हणाले की, हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत बसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला. नवाब मलिकांनी म्हटलं की, २००५ साली मी मंत्रीपदावर नव्हतो. सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला ५ महिन्यांपूर्वी मिळाली आहे. सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते, असं मलिक म्हणाले.
मलिकांनी यावेळी म्हटलं की, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. ८ ऑक्टोबर २०१७ मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले. मी जे आरोप फडणवीसांवर लावतोय याबाबत मी नक्कीच गृहविभागाला माहिती देईन, असंही ते म्हणाले.
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर बोलताना ते म्हणाले की, मी महिलांच्या आरोपांवर उत्तर देणार नाही. काळ्या पैशांवरुन माझ्यावर आरोप लावले जातात. मग, २०० कोटींचे फ्लॅट बीकेसीत, वरळीत कोणाच्या नावावर आहे हे काढू का? असं ते म्हणाले.