जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी झाल्याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला त्यांच्या तिन्ही मुलांवर गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. गफ्फार मलिक यांच्या अंतयात्रेदरम्यान झालेल्या गर्दीस जबाबदार धरून त्यांच्या मुलांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटल आहे की, दि. २५ मे २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी तसेच सर्वधर्मीय उत्सव सण व इतर कार्यक्रमात सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणारे स्वर्गीय हाजी गफ्फार मलीक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले.
स्वर्गीय मलिक यांचे निधन ही जळगाव जिह्यातील तसेच सर्व धर्मीय नागरीकांसाठी तसेच आप्तस्वकीयांसाठी अतिशय दुख:दायक बाब ठरली. स्व. गफ्फार मलिक अंतिम संस्कारासाठी त्यांच्या काटुंबीयांकडुन कोणत्याही उपस्थितीचे आवाहन तसेच अंतिम यात्रेची मिरवणुक किंवा गर्दी जमवण्याच्या दृष्टीने आव्हान केले गेले नव्हते.
हिंदु व मुस्लिम संस्कृतीनुसार स्व. गफ्फार मलिक यांच्या प्रेमापोटी सर्वधर्मीय नागरीक तसेच सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते स्वत:हुन त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे स्व. गफ्फार मलिक यांचे कुटुंब जमलेल्या गर्दीस जबाबदार ठरू शकत नाही.
स्व. गफ्फार मलीक यांची मुले एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजवा अब्दुल गफ्फार मलिक यांच्यावर शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. सदरहु कृत्यास मलिक कुटुंबीय जबाबदार नसतांना त्यांना जबाबदार धरणे न्यायला धरून होणार नाही, असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर प्रतिभाताई शिंदे, संजय मुरलीधर पवार, अँड. विजय भास्कर पाटील, विनोद देशमुख, सचिन धांडे, मिलिंद सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, मुकुंद सपकाळे, योगेश पाटील, मुकेश टेकवानी, प्रमोद पाटील, मनोज वाणी, सुहास चौधरी, मूर्तीकोराज कोल्हे, ललित बागुल, दिलीप लाळापुरे, रवी देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.